

Singer Mohit Chauhan Collapse On Stage viral video
भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काल रात्री आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत महोत्सवात (रेटीना) बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांना एका दुर्घटनेला सामोरे जावे लागले. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये गाणे गाता गाता अचानक ते स्टेजवर कोसळले. त्यांचा पाय स्टेजवर पडलेल्या केबल वायरमध्ये अडकल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भोपाळ एम्सच्या वार्षिक फेस्ट 'रेटिना ८.०' मध्ये मोहित चौहान आपले सुपरहिट गाणे 'नादान परिंदे' सादर करत होते. आपल्या मधुर आवाजाच्या जादूने ते चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असताना, ते गाणं गाता गाता स्टेज लाईटच्या दिशेने पुढे सरकले. त्याचवेळी लाईट फिटिंगसाठी वापरण्यात आलेल्या केबलमध्ये त्यांचा पाय अडकला आणि त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले.
मोहित चौहान स्टेजवर पडताच उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. अनेक चाहते ओरडू लागले. स्टेजवर उपस्थित असलेले सुरक्षा कर्मचारी आणि क्रू-मेंबर्स यांनी तात्काळ धाव घेत मोहित चौहान यांना उचलून सावरले. काही सेकंदांच्या विरामानंतर मोहित चौहान यांनी दाखवलेली व्यावसायिकता वाखाणण्याजोगी होती. त्यांनी लगेचच आपले गाणे पुढे सुरू केले आणि यशस्वीरित्या परफॉर्मन्स पूर्ण केला.
या घटनेत मोहित चौहान यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षा पथक आणि डॉक्टरांनी तातडीने मदत पुरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मोहित चौहान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, जिथे चाहते त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या धैर्याचे कौतुक करत आहेत.