

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग बनवण्याचे काम केंद्र सरकार करेल, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि.२९) लोकसभेत केले. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान ते म्हणाले की, सरकार पीओके कधी घेणार? असा सवाल विरोधी पक्ष करत आहे. कलम ३७० हटवले गेले, राम मंदिर बांधण्याचे काम झाले, वक्फ दुरुस्ती विधेयकाचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणेच पीओकेला भारताचा भाग बनवण्याचे कामही आमचे सरकार करेल, असे ते म्हणाले. यावेळी श्रीकांत शिंदेंनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरुन विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
संसदेत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘ऑपरेशन महादेव’च्या माध्यमातून आपल्या सैनिकांनी पहलगाम हल्ल्यामुळे बाधित झालेल्या २६ कुटुंबांना न्याय देण्याचे काम केले. पहलगामचा बदला घेऊन भारतीय सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहे की, भारतावर हल्ला करण्याची किंमत किती मोठी आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबद्दल बोलत आहेत. दहशतवादी कसे आले? ते कुठून आले? त्या दहशतवाद्यांचे काय झाले? असे सवाल विरोधी पक्ष करत आहे. मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, २००६ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी कुठून आले? २००६ मध्ये, केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्ष सत्तेत होता, तेव्हा १२७ लोक मारले गेले. या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. याचा अर्थ असा की तत्कालीन सरकार योग्य तपासही करू शकले नाही, असा आरोप खासदार शिंदेंनी केला. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून मारण्यात आले. मात्र, २००६ च्या हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या १२७ लोकांचे कुटुंब अजूनही न्यायाची याचना करत आहेत. त्यांना कोण न्याय देणार? त्यांना न्याय कधी मिळेल? असे सवाल खासदार शिंदे यांनी केले.
शाहिद लतीफ आणि एलईटी, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी म्हणून सूचीबद्ध असलेल्या २५ इतर दहशतवाद्यांना कोणी सोडले? त्यानंतर पठाणकोटवर हल्ला कोणी केला? शहीद लतीफला का सोडण्यात आले? दहशतवादाविरोधातील पोटा कायदा कोणी रद्द केला? असे सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. हे सर्व काँग्रेसने केले असल्याचे ते म्हणाले. देशात झालेले सर्व दहशतवादी हल्ले पोटा कायदा रद्द झाल्यामुळेच झाले, असा दावा त्यांनी केला.
१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी इक्बाल मुसा मुंबईत लोकसभा निवडणुका सुरू असताना कोणाच्या प्रचारासाठी आला होता, असा सवाल खासदार शिंदेंनी केला. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुबद्दल तत्कालीन गृहमंत्र्यांना खूप सहानुभूती होती. मात्र, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, सर्वात पहिले काम म्हणजे अफजल गुरुला फाशीची शिक्षा द्यावी. बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतींना अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यास सांगितले, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.