

Hate speech case : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा, मऊ सदर मतदारसंघाचे आमदार अब्बास अन्नारी यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी उत्तर प्रदेशमधील न्यायालयाने दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे विधानसभेचे सदस्यत्व गमावण्याची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ३ मार्च २०२२ रोजी विधानसभा निवडणुकीदरम्यान सुभास्पा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे अब्बास अन्सारी यांनी द्वेषपूर्ण भाषण दिले. शहरातील पहाडपूर मैदानात झालेल्या जाहीर सभेत मऊ प्रशासनाला निवडणुकीनंतर हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती. मी सपा प्रमुख अखिलेश यादव यांना सांगितले आहे की सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिने कोणाचीही बदली किंवा नियुक्ती केली जाणार नाही. जो कोणी जिथे असेल तिथेच राहील. प्रथम हिशेब चुकता केले जातील. नंतर बदल्या होतील, अशी धमकी अब्बास यांनी दिल्याची पोलीस अधिकारी गंगाराम बिंद यांनी दिली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार अब्बास अन्सारी आणि इतरांना आरोपी करण्यात आले होते.
न्यायालयाने अब्बास अन्सारी यांना आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच अब्बास यांचा भाऊ मन्सूर अन्सारीलाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कलम १२० ब, आयपीसी अंतर्गत त्याला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
न्यायालयात शिक्षा जाहीर झाल्यानंतर अब्बास अन्सारी यांनी मऊ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयाचे आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. आमची बाजू पूर्णपणे विचारात घेतली नाही. त्यामुळे आम्हाला या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचेही अन्सारी यांनी म्हटलं आहे.
अब्बास अन्सारी यांना न्यायालय किती वर्षांची शिक्षा सुनावणार यावर त्याच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून होते. त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होणार का, असे सवालही केले जात होते. त्यांनादोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असती तर त्यांना आमदारकी गमवावी लागली असती. मऊ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता त्यांना विधानसभा सदस्यत्व गमवावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.