

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ्सचा फटका टाळण्यासाठी टेक जायंट ॲपल कंपनीने भारतातून तब्बल 600 टन आयफोन अमेरिकेत स्पेशल कार्गो विमानातून एअरलिफ्ट केले आहेत.
यातून जवळपास 15 लाख आयफोन अमेरिकेत रवाना केले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिका ही आयफोन्सची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. ट्रम्प टॅरिफ्स टाळण्यासाठी आणि अमेरिकेत आयफोन्सचा मोठा साठा करता यावा यासाठी ॲपल कंपनीने हे पाऊल उचलल्याचे दिसत आहे.
व्यापार विश्लेषकांनी नुकताच इशारा दिला होता की, iPhones च्या किंमती अमेरिकेत झपाट्याने वाढू शकतात, कारण आयफोन्सची आयात मोठ्या प्रमाणात चीनमधून होते. आता ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के टॅरिफ लावले आहे. त्यामुळे अर्थातच अमेरिकेत आयफोन्सच्या किंमती वाढणार. पण त्यापुर्वीच आयफोन्सचा मोठा साठा ॲपलने भारतातून अमेरिकेत नेला आहे.
Apple कंपनीने चेन्नई विमानतळावर कस्टम क्लिअरन्ससाठी लागणारा वेळ 30 तासांवरून 6 तासांपर्यंत कमी करण्यासाठी भारतीय विमानतळ अधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू केले. या कथित "ग्रीन कॉरिडॉर" व्यवस्थेची अंमलबजावणी Apple ने चीनमधील काही विमानतळांवरही केली होती.
मार्चपासून सुमारे 100 टन क्षमतेच्या सहा मालवाहू विमानांनी भारतातून उड्डाणे केली आहेत. त्यापैकी एक विमान या आठवड्यात उड्डाण करताना नवीन टॅरिफ लागू झाले, अशी माहिती आहे. एकंदरीत टॅरिफ आधीच माल अमेरिकेत न्यायचे ॲपलचे नियोजन होते.
iPhone 14 आणि त्याच्या चार्जिंग केबलसह पॅकेजचे वजन सुमारे 350 ग्रॅम आहे. त्यामुळे 600 टनाच्या कार्गोमध्ये सुमारे 15 लाख iPhones होते, असे गृहित धरता येते. दरम्यान, Apple आणि भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भात काहीही टिप्पणी केलेली नाही.
ॲपल दरवर्षी जगभरात 220 दशलक्षाहून अधिक आयफोन्स विकते. Counterpoint Research च्या अंदाजानुसार, आता अमेरिकेत येणाऱ्या आयफोन्सपैकी पाचवा हिस्सा (20 टक्के) भारतातून येतो, तर उर्वरित आयफोन्स अजुनही चीनमधून अमेरिकेत निर्यात केले जातात.
आयफोनची किंमत वाढणार
दरम्यान, ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ वाढवून बुधवारी 125 टक्के केले. जे पूर्वी 54 टक्के होते. 54 टक्के टॅरिफ दराने, अमेरिकेत आयफोन-16 Pro Max जो सध्या 1599 डॉलरला आहे, त्याची किंमत 2300 डॉलरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.
फॉक्सकॉन ही कंपनी आयफोनचे उत्पादन करते. कंपनीने भारतात रविवारीदेखील उत्पादन सुरू ठेवले आहे. भारतामध्ये Apple ने आयफोन्स प्लांट्समधील उत्पादन 20 टक्के वाढवण्याच्या उद्दिष्टासाठी हवाई वाहतूक वाढवली आहे.
अधिक कामगार नियुक्त केले आहेत, असे कळते. चेन्नईतील Foxconn कारखान्यात आता रविवारीही सुरू असणार आहे. या फॅक्टरीने गेल्या वर्षी 2 कोटी आयफोन्स तयार केले. ज्यात iPhone 15 आणि 16 या नवीन मॉडेल्सचा समावेश आहे.
Apple चीनव्यतिरिक्त अन्य देशांत उत्पादन वाढवत असताना त्यात भारताला एक महत्त्वाची भूमिका दिली आहे. Foxconn आणि Tata हे दोन प्रमुख पुरवठादार तीन कारखाने चालवतात तर आणखी दोन कारखाने बांधणीच्या टप्प्यात आहेत.
Apple ने चेन्नईमध्ये जलद कस्टम क्लिअरन्स सेटअप उभारण्यासाठी सुमारे आठ महिने नियोजन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अधिकाऱ्यांना Apple ला मदत करण्याचे निर्देश दिले, असे एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने सांगितल्याचे रॉयटरच्या वृत्तात म्हटले आहे.
Foxconn कडून भारतातून अमेरिकेत जानेवारीमध्ये 770 दशलक्ष डॉलरची शिपमेंट गेली तर फेब्रुवारीत 643 दशलक्ष डॉलरची शिपमेंट झाली. जी मागील चार महिन्यांत 110 दशलक्ष डॉलर ते 331 दशलक्ष डॉलर या दरम्यान होती, असे उपलब्ध कस्टम डेटावरून दिसते.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत Foxconn च्या 85 टक्क्यांहून अधिक हवाई शिपमेंट्सचे सामान शिकागो, लॉस एंजलिस, न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को येथे उतरवले गेले.