

mea press conference india vs pakistan pok
नवी दिल्ली : ‘जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाईल. त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही. पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर (पीओके) रिकामे करावे लागेल. हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले. ते मंगळवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत बोलत होते.
10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर शस्त्रसंधीवर सहमती झाल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. तांत्रिक कारणांमुळे हॉटलाइनद्वारे भारताशी संपर्क साधता न आल्याने पाकिस्तानने त्याच दिवशी पहाटे 12:37 वाजता या संभाषणाची विनंती केली. त्यानंतर भारतीय डीजीएमओ यांच्या उपलब्धतेनुसार दुपारी 15:35 वाजता कॉल करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. भारताने स्पष्ट केले की, त्याच दिवशी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर अत्यंत प्रभावी हल्ले केले. भारतीय लष्कराच्या ताकदीमुळेच पाकिस्तानला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यास भाग पाडले.
ते पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला तर भारतीय सैन्यही त्याला प्रत्युत्तर देईल. पण जर पाकिस्तान थांबला तर भारतही थांबेल. 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करताना पाकिस्तानलाही हाच संदेश देण्यात आला होता, ज्याकडे त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले.’
ट्रम्प आणि व्यापाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर जैस्वाल म्हणाले की, ‘7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून ते 10 मे रोजी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याच्या करारापर्यंत, भारत आणि अमेरिकेमध्ये तत्कालीन लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. यापैकी कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा आला नाही.’
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, विजयाचा दावा करणे पाकिस्तानची जुनी सवय आहे. १९७१, १९७५ आणि १९९९ च्या कारगिल युद्धात देखील असेच करण्यात आले होते. ढोल पिटण्याची पाकिस्तानची सवय आहे. पराभूत झालो तरी ते ढोल वाजवतील.
भारत सिंधू जल करार तोपर्यंत स्थगित ठेवेल जोपर्यंत पाकिस्तान खात्रीशीर आणि ठामपणे सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.