सुषमा नेहरकर-शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील वातावरण बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे परिणाम येणार्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येतील.
सध्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप मोहिते पाटील हे आमदार आहेत. संघर्षमय वातावरणात तालुक्याच्या राजकारणात ‘एन्ट्री’ केलेले दिलीप मोहिते पाटील सलग वीस वर्षे आमदार असलेल्या नारायण पवार यांचा पराभव करून 2004 मध्ये आमदार झाले. दिलीप मोहिते पाटील तालुक्याचे नेतृत्व करतात, त्यामुळेच खेड तालुक्यात आता विरोधकांना प्रस्थापितांविरुद्ध तगडा लढा द्यावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत राहिलेल्या अनेक आमदारांची चलबिचल सुरू असताना मोहिते पाटील मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून, तालुक्यातील बहुतेक सर्व नेते, कार्यकर्ते देखील त्यांच्याच सोबत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार, हे नक्की आहे. यासोबतच अजित पवार गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे हे देखील इच्छुक असून, तयारी सुरू आहे.
महाविकास आघाडीत शरद पवार गटाने या मतदारसंघावर भक्कम दावा केला आहे. भाजपमधून शरद पवार गटात सहभागी झालेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आमदारकी लढविलेले अतुल देशमुख प्रमुख दावेदार मानले जातात. शरद पवार यांच्यासोबत आम्ही पहिल्या दिवसापासून भक्कमपणे उभे असून, तिकीट देताना निष्ठावान लोकांचा विचार करावा, अशी भूमिका घेत सुधीर मुंगसे यांनी देखील तिकिटावर हक्क सांगितला आहे. याशिवाय रामदास ठाकूर हेदेखील तयारी करीत आहेत.
मतदारसंघात सर्वाधिक फरपट सध्या दोन्ही शिवसेनेची सुरू आहे. या मतदारसंघात सुरुवातीपासून निष्ठावान शिवसैनिकांचा एक मोठा गट असून, तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडतो. यामुळेच उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे गेल्या पाच वर्षांपासून आमदारकीची तयारी करीत असून, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. काळे यांना तिकीट मिळाले, तर चांगली लढत होऊ शकते. पण, उबाठा गटाला खेड-आळंदी मतदारसंघ मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते. याशिवाय, उबाठा गटातून माजी सभापती अमोल पवार यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.
1999-2004 : काँग्रेसचे उमेदवार नारायण पवार 47 हजार 926 मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांनी 44 हजार 91 मते मिळवली.
2004-2009 मध्ये : दिलीप मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमधून उभे राहिले आणि 76 हजार 769 मते घेत विद्यमान आमदार नारायण पवार यांचा तब्बल 14 हजारांहून मतांनी पराभव केला. 2009-2014 मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील आमदार झाले. त्यांनी 64 हजार 726 मते घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. या वेळी शिवसेनेचे उमेदवार अशोक खंदेभार यांना 43 हजार 934 मते मिळाली. 2014-2019 मध्ये शिवसेनेचे सुरेश गोरे यांनी तब्बल 1 लाख 3207 मते घेऊन विद्यमान मोहिते पाटील यांचा पराभव केला. 2019-2024 मध्ये पुन्हा एकदा जुनीच लढत झाली. दिलीप मोहिते पाटील मताधिक्य घेत आमदार झाले.