

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या, तरी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अनेक अर्थाने देशात लक्षवेधी असणार आहेत. महाविकास आघाडीतील राज्यातील नेत्यांचे दिल्ली दौरे या निवडणुकीच्या द़ृष्टीने महत्त्वाचे संकेत देत आहेत...
विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीनंतर राज्यात जी समीकरणे उदयास आली, त्यातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. महाविकास आघाडीमध्ये आमदारांची सर्वात जास्त संख्या उद्धव ठाकरेंकडे होती. आगामी विधानसभेला मात्र महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढवणार, हे अद्याप ठरले नाही. त्यामुळे विधानसभेत जो जास्त जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा, असा एक मतप्रवाह महाविकास आघाडीमध्ये आहे, तर उद्धव ठाकरेंचा चेहरा पुढे करून या निवडणुका लढवाव्या, असाही एक मतप्रवाह आहे. यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. काँग्रेसमध्ये मात्र तसे नाही. काँग्रेसमध्ये राज्यात संघटना असली तरी पक्षाचे प्रमुख निर्णय दिल्लीतून घेतले जातात. राज्य संघटनेचे प्रमुख असलेले नाना पटोले काँग्रेस पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलत आहेत. असं बोलणे म्हणजे आमचा मुख्यमंत्री होईल, असा सूचक संदेश ते यानिमित्ताने देत आहेत. त्यांची ही गोष्ट इतरांना खटकत नसेल, तर नवलच.
लोकसभेत महाराष्ट्रात मिळालेल्या जागांवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठही खूश आहेत. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका वेगळी आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे पहिले लक्ष्य आहे. मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीने अद्याप काहीही भाष्य केले नसले, तरी त्या दृष्टीने त्यांची ही तयारी आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयाने मिळवून दिलेला आत्मविश्वास तिन्ही पक्षांना विधानसभेत सत्ता मिळेल, असा विश्वास देत आहे. या निमित्ताने एक मात्र स्पष्ट होत आहे की, विधानसभा निवडणुकीकडे राज्यातील नेते वेगळ्या दृष्टीने तर केंद्रातील नेते वेगळ्या दृष्टीने पाहतात. मात्र, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्रिपद यांच्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसमोर सत्ताधारी महायुती असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, यासाठी विधानसभेची लढाई कोण जिंकणार, हे बघावे लागणार आहे
महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे अलीकडेच दिल्ली दौरे झाले. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांच्या दौर्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवारांचीही भेट घेतली
काँग्रेसच्या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील दिल्ली दौर्यावर होते. त्यांनीही काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद पवार सर्वेसर्वा आहेत. मात्र, संसद अधिवेशनाच्या काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही काही पदाधिकारी दिल्लीत येऊन गेले. स्वतः शरद पवार दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील नेत्यांना अधूनमधून भेटत असतात. या सगळ्या भेटीगाठींमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक केंद्रस्थानी असते.
मुंबई : मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली असली, तरी काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. निवडणुकीनंतर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, असे काँग्रेस नेते बोलत आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना काँग्रेस श्रेष्ठींना कॉल करायला तर सांगत नसावेत ना?