CJP Protest Delhi | आंदोलनाचे नेतृत्‍व विद्यार्थ्यांकडे!

तरुणांचा आक्रोश संसदेपर्यंत; दिल्लीच्या रस्त्यांवर उसळली गर्दी
CJP Protest Delhi |
CJP Protest Delhi | आंदोलनाचे नेतृत्‍व विद्यार्थ्यांकडे!
Published on
Updated on

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्‍या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत हजारो विद्यार्थ्यांनी, युवा कार्यकर्त्यांनी सोमवारी आपला आवाज बुलंद केला. संसद मार्गावर युवाशक्‍तीचे दर्शन घडवले. जंतर-मंतर येथील आंदोलकांना बळाचा वापर करून हटवण्‍यात आले असले, तरी संसद परिसरात ठिकठिकाणी हे आंदोलन पसरले. कॉक्रोच जनता पार्टी हे निमित्त असले, तरी प्रत्‍यक्षात येथे दाखल झालेल्‍या हजारो विद्यार्थ्यांनीच हे आंदोलन हातात घेतल्‍याचे चित्र होते. तरुणांचा हा आक्रोश संसदेच्‍या दारापर्यंत पोहोचवण्‍यात त्‍यांना यश मिळाले.

‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आयोजित ‘संसद मार्च’मध्‍ये हजारो तरुणांनी संसदेच्या दिशेने कूच केली. यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करून परिसराचे रूपांतर छावणीत करण्यात आले होते. आंदोलकांना मोर्चादरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा आणि लाठीमाराचा सामना करावा लागला. हे सर्व सहन करूनही, आंदोलक संसदेच्या प्रवेशद्वारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आणि त्यानंतरच ते माघारी फिरले. काही भागांत पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात चकमकी झाल्या, ज्यात दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले. २० जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू होते. मोर्चामध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त होती. याबरोबर महिला आणि विद्यार्थिनींची संख्यादेखील लक्षणीय पाहायला मिळाली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी संसदेवरील मोर्चाला परवानगी दिली नव्हती. केवळ, जंतर-मंतर ते केरळ हाऊसपर्यंत या मोर्चाची परवानगी देण्यात आली होती. यामुळे केरळ हाऊसजवळच अभिजित दीपके यांच्या वाहनाला थांबवण्यात आले. अभिजित दीपके यांच्यासह सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो, अभिनेते प्रकाश राज आणि इतर मंडळी इथे होती. दिवसाच्या शेवटपर्यंत या आंदोलकांना तिथून पुढे जाऊ दिले नाही.

आंदोलक आणि पोलिस रक्तबंबाळ

दगडफेक आणि लाठीमारामध्ये आंदोलक आणि पोलिस दोघेही गंभीर जखमी झाले. काहीजण रक्तबंबाळ देखील झाले. याबरोबर आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांच्या काचादेखील फोडल्या.

आंदोलनस्थळावरील मंच हटवला

मागच्या महिनाभरापासून जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू होते, त्या ठिकाणचा मंच, पोस्टर्स आणि इतर बाबींना प्रशासनाकडून हटवण्यात आले. यामुळे जंतर-मंतर आंदोलनस्थळ पूर्णपणे रिकामे झाल्याचे पाहायला मिळाले.

सप आणि आपच्या नेत्यांचा मोर्चात सहभाग

समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव, धर्मेंद्र यादव यांनी मोर्चात सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांना ताब्यातदेखील घेतले. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, माजी मुख्यमंत्री अतिशी, सौरभ भारद्वाज यांनी देखील मोर्चात सहभाग नोंदवला.

महाराष्ट्रातील मुलांची लक्षणीय उपस्थिती

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये विविध राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी संघटनादेखील उपस्थित होत्या. यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणांनी जंतर-मंतर परिसर दणाणून सोडला.

नड्डा यांच्याशी चर्चा

‘सीजेपी’ने म्हटले आहे की, सरकारने चर्चेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांच्या दोन प्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. या चर्चेबाबत सरकारकडून अधिकृत काही सांगण्यात आले नसले, तरी ‘सीजेपी’चे प्रवक्ते सौरव दास म्हणाले, आम्ही आमच्या मागण्यांचे लेखी पत्र सादर केले असून, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, ते यादरम्यान अंतर्गत चर्चा करतील. आम्ही त्या प्रक्रियेत आहोत. मोठ्या प्रमाणावर लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहेत.

सकाळपासून काय घडले?

सकाळी ६.३९ : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मोर्चा संपल्यानंतर त्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.

सकाळी ८.४५ : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली की, जर मोर्चा नियंत्रणात ठेवला, तर सरकार चर्चा करण्यास आणि संवादाची नवीन दारे उघडण्यास तयार आहे.

सकाळी ९.०० : नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी माहिती दिली की, पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पोलिसांची विनंती फेटाळली.

सकाळी ९.३० : नियोजित मोर्चाच्या वेळेच्या २५ मिनिटे आधीच, दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावून आंदोलकांना जंतरमंतर आंदोलनस्थळावरून बाहेर पडण्यापासून रोखले.

सकाळी १०.०० : सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो जंतर-मंतर येथे पोहोचल्या.

सकाळी १०.०० : 'आप'चे खासदार संजय सिंह, भीम आर्मीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद, वकील प्रशांत भूषण, अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिजित दिपके

आंदोलनस्थळी.

सकाळी १०.२० : 'आयसा'च्या कार्यकर्त्या नेहा, आमीन आणि मनीष यांनी त्यांचे उपोषण सोडले.

सकाळी १०.५० : पोलिसांनी पटेल चौक मेट्रो स्थानकाजवळ सौम्य बळाचा वापर केला.

सकाळी ११.०० : पोलिसांनी बॅरिकेडस्‌ हटवले आणि मोर्चा पुढे जाण्यास परवानगी दिली.

सकाळी ११.४५ : अनेक आंदोलकांनी बॅरिकेडस्‌ तोडले आणि पटेल चौकाच्या दिशेने कूच केली.

सकाळी ११.५५ : समाजवादी पक्षाच्या

खासदार डिंपल यादव खासदारांसह संसदेतून जंतर-मंतरच्या दिशेने निघाल्या.

सकाळी ११.५९ : सरकारने चर्चेसाठी संपर्क साधल्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना भेटण्यासाठी निघाले.

दुपारी १.३० : सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

दुपारी २.२८ : सौरव दास यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी आणि आशुतोष रांका यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

दुपारी ४.०० : पोलिसांनी आंदोलकांवर कडक कारवाई केली; स्टेज रिकामा केला.

रात्री ९.१० : आशुतोष रांका यांनी सांगितले की, ग्रुप आंदोलकांमधील दुखापतींच्या तीव्रतेचे मूल्यांकन करत असून, कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरवत आहे.

विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले

२३ दिवस उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शबाना आझमी आणि प्रकाश राज यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडले.

राजधानीला छावणीचे स्वरूप; संसदेची सुरक्षा वाढवली

कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संसद भवन, केंद्रीय सचिवालय, जंतर-मंतर, राजीव चौक आणि परिसरामध्ये हजारो पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केल्याने राजधानीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंत्रालय आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली.

पाच मेट्रो स्थानके बंद

सीजेपीच्या संसद मार्चमुळे सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सोमवारी पाच मेट्रो स्थानके बंद केली, ज्यामुळे शेकडो प्रवाशांची तारांबळ उडाली. राजीव चौक, पटेल चौक आणि इतर स्थानकांचे दरवाजे बंद राहिल्याने तिथे गर्दी झाली होती. काही आंदोलक मेट्रो आवारात एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली, तर पटेल चौक स्थानकाजवळ गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सौम्य बळाचा वापर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news