जयपूर, वृत्तसंस्था : लिथियमच्या रूपाने भारताला पुन्हा एकदा मोठा लाभ झाला असून, राजस्थानात जम्मू-काश्मीरपेक्षाही मोठे लिथियमचे साठे सापडले आहेत. येथे आढळलेले साठे देशाची लिथियमची 80 टक्के गरज भागवणारे आहेत.
भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील देगाना येथे हे साठे आढळले आहेत. आधी येथे थोड्या प्रमाणात लिथियम असेल, असा अंदाज होता; पण प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक लिथियम येथे उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या 59 लाख टनांपेक्षाही अधिक साठे येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकट्या राजस्थानमधील साठ्यानेच भारताची लिथियमची 80 टक्के गरज भागणार आहे. सध्या भारताची सारी मदार चीनच्या लिथियमवर अवलंबून असते. 2020-21 या काळात भारताने 6 हजार कोटी रुपयांचे लिथियम आयात केले होते. त्यापैकी 3,500 कोटींचे लिथियम चीनकडून घ्यावे लागले होते.
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. 2030 पर्यंत भारतात रस्त्यावर 14 लाखांच्या आसपास इलेक्ट्रिक वाहने धावतील, असा अंदाज आहे. त्यामुळे सापडलेले नवीन साठे भारताची भविष्यातील लिथियमची वाढती गरज पाहता उपयोगी ठरणार आहे.