

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली इथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. विशेष म्हणजे मूळच्या कश्मीरच्या बांदीपोरा येथील असलेल्या सुप्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर यांनी उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत गायले. एका काश्मिरी गायिकेने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्य गीत गायले तेव्हा विशेष उत्साह सभागृहात दिसून आला. कार्यक्रमाच्या शेवटी शमिमा अख्तर यांनी आपल्या मधुर आवाजात पसायदानदेखील सादर केले. त्यांच्या महाराष्ट्र गीत गायनाने आणि पसायदानाने उपस्थित्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. शमिमा अख्तर सुप्रसिद्ध गायिका असून साहित्य संमेलन आयोजक संस्था सरहदशी त्या संबंधित आहेत.
शमिमा अख्तर यांनी मराठीसह कानडी, बंगाली, डोंगरी, पंजाबी, संस्कृत आणि काश्मिरी भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. सरहद म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर शमिमा यांनी गायिलेल्या "लाभले आम्हास भाग्य" या मराठी गाण्याचा व्हिडिओदेखील आहे.
अनेक दिग्गज मराठी साहित्यिकांची नावे, साहित्य संमलेनाचा इतिहास, मराठी साहित्याची परंपरा अशा अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेल्या आणि पुढे अनेक दिग्गज मान्यवर ज्या गोष्टीचा अविभाज्य भाग झाले त्या साहित्य संमेलनाच्या अत्यंत गौरवशाली परंपरेचा मला भाग होता आले. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी कायम मराठी बोलण्याचा आणि मराठीतील नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.
माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतासही पैजा जिंके हे संत ज्ञानेश्वरांचे शब्द मराठी भाषेची महती सांगतात. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न, नवे मराठी शब्द शिकण्याचा कायम प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष झाली, अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे हे ३०० वर वर्ष आहे, अलीकडेच भारतीय संविधानाला ७५ वर्ष झाले. या सर्व औचित्यावर साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशात आणि जगात १२ कोटींपेक्षा अधिक मराठी लोक आहेत, त्यांना मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचा प्रतिक्षा होती, मराठीला अभिजात दर्जा देण्याची संधी मला मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. कुठलीही भाषा ही संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजात जन्म घेते मात्र समाजाची निर्मिती करण्यात भाषेची भूमिका महत्त्वाची असते, असेही पंतप्रधान म्हणाले.
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे समर्थ रामदास म्हणाले. मराठी भाषा म्हणजे शौर्य, समानता, वीरता, अध्यात्म, आधुनिता, भक्ती, शक्ती, युक्ती यांचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, संत बहिणाबाई, संत गोरा कुंभार अशा अनेक थोरामोठ्यांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभली. पुढे ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांचेही कार्य आणि मराठी भाषेवरील प्रभाव आपण जाणतो. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव या वीरांनीही शत्रूंना सळो की पळो करून सोडले. यामध्येही भाषेची भूमिका महत्त्वाची होती. वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक यांना भाषेने मोठे प्रेम दिले. भाषेने सामाजिक मुक्तीचे द्वार उघडले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे काम केले. मराठी भाषेने दलित साहित्य दिले, विज्ञान कथांची रचना केली, तर्कशास्त्रात योगदान दिले. महाराष्ट्रात विचारांना आणि प्रतिभाना महत्व आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.