

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या कृतीने सर्वांची मने जिंकली. शरद पवार यांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदराने खुर्ची ओढून दिली. एवढेच नव्हे तर, मोदी यांनी स्वतःच्या हाताने बाटलीतील पाणी ग्लासमध्ये भरून पवार यांना दिले.
शुक्रवारी नवी दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना त्यांच्या जागेवर बसण्यास मदत करून आणि त्यांना एक ग्लास पाणी देऊन आदर व्यक्त केला. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधान मोदी दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात करणार होते, परंतु त्यांनी समारंभाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दीपप्रज्वलनात सहभागी होण्याची विनंती केली.
नंतर, जेव्हा शरद पवार आपले भाषण संपवून पंतप्रधान मोदींच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसण्यासाठी आले, तेव्हा पंतप्रधानांनी शरद पवार यांना बसण्यास मदत केली आणि स्वतः बाटलीतून ग्लासमध्ये पाणी भरून त्यांना पिण्यास दिले.
पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात करताना सांगितले की, शरद पवारांच्या निमंत्रणावरूनच त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यास सहमती दर्शवली. ते म्हणाले की, आज शरद पवारजी यांच्या निमंत्रणावरून मला या गौरवशाली परंपरेत सामील होण्याची संधी मिळाली आहे.