नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील कुमी-झोमी समाजाच्या दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहांत गुरुवारी पहिल्याच दिवशी उमटले. या संवेदनशील विषयावर सर्वप्रथम चर्चा घ्यावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर निवेदन करावे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला. त्यानंतर उडालेल्या प्रचंड गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. राज्यसभेत दोनवेळच्या तहकुबीनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पडले. मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत सांगितले. सभापती जगदीप धनकड यांनीही या विषयावर अल्पकालीन चर्चेची परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगितले. मात्र, तेवढ्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. संसद चालू देण्याची विरोधकांची मानसिकता नसल्याचा आरोप यावर गोयल यांनी केला. अन्य सगळे कामकाज बाजूला ठेवून आधी या विषयावर चर्चा घेण्याचा आग्रह काँग्रेसचे सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. तृणमूलचे खासदारही यावरून आक्रमक झाले होते.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावर सोनिया यांनी आपण उत्तम असल्याचे मोदी यांना सांगितले. बंगळूरमध्ये झालेल्या विरोधी आघाडीच्या बैठकीनंतर दिल्लीला परतत असताना सोनिया गांधी यांना घेऊन जाणारे विमान खराब हवामानामुळे भोपाळमध्ये उतरविण्यात आले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी ऑक्सिजन मास्क घातल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यांनीही मणिपूरच्या घटनेवर संसदेत चर्चा घेतली जावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
माझे हृदय वेदनांनी आणि रागाने भरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मणिपूरमधील घटना कुठल्याही सभ्य समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाचा अवमान झाला आहे. 140 कोटी देशवासीयांची शरमेने मान खाली गेली आहे. माता-भगिनींच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत. प्रत्येक राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. घटना राजस्थानमधील असो, छत्तीसगडमधील असो अथवा मणिपूरमधील असो. राजकीय मतभेद विसरून कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. मणिपूरच्या या 'बेटीं'सोबत जे झाले ते कधीही माफ केले जाणार नाही. सरकार कोणालाही सोडणार नसून, दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मणिपूरमधील संतापजनक घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयानेही स्वतःहून घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र आणि मणिपूर सरकारला यासंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. जर सरकारने कडक कारवाई केली नाही, तर न्यायालय स्वत: या प्रकरणात हस्तक्षेप करेल, असेदेखील सरन्यायाधीशांनी ठणकावले आहे.
मणिपूरमधील कुमी-झोमी समाजाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करून फिरविल्याच्या घटनेचा व्हिडीओ आपापल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावा, असे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरसह अन्य सोशल मीडिया माध्यमांना दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन. वीरेन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.