

Manipur Internet Suspended : मणिपूरमधील मैतेई समाजाचे नेते अरम्बाई टेंगगोल यांना अटकेनंतर शनिवारी (दि. ७) रात्री इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यानंतर रात्री ११:४५ वाजल्यापासून मणिपूर सरकारने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे.
मणिपूर गृह विभागाचे आयुक्त-सह-सचिव एन. अशोक कुमार यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करू शकतात. या माध्यमातून द्वेषपूर्ण मेसेज, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडू शकते. यामुळे इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
गृह विभागाने आदेशात म्हटलं आहे की, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यांमध्ये सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक आहे. काही असामाजिक घटक सोशल मीडियाद्वारे प्रक्षोभक संदेश पसरवू शकतात. यामुळे लोकांच्या भावना भडकू शकतात अशी भीती आहे. यासोबतच, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर कारवाई करता यावी म्हणून हा आदेश एकतर्फी जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, व्हीएसएटी आणि व्हीपीएनसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा ७ जून रोजी रात्री ११:४५ वाजल्यापासून बंद झाल्या आहेत.
मैतेई समाजाचे नेते अरम्बाई टेंगगोल यांच्या अटकेनंतर शनिवारी रात्री इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम येथे निदर्शने झाली. निदर्शकांनी क्वाकेइथेल आणि उरिपोक सारख्या भागात टायर आणि फर्निचर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (पीपल्स वॉर ग्रुप) आणि युनायटेड पीपल्स पार्टी ऑफ कांगलेईपाक (यूपीपीके) यासारख्या बंदी घातलेल्या गटांमधील तीन फुटीरवाद्यांना अटक केली आहे.
मणिपूर राज्यात मे २०२३ पासून मैतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये संघर्ष सूरु आहे. आतापर्यंत यामध्ये २६० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.