Manika Vishwakarma Miss Universe India 2025
जयपूर : जयपूर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला. गेल्या वर्षीची विजेती रिया सिंघा हिच्या हस्ते मणिकाला हा मुकुट प्रदान करण्यात आला. या विजयासह, नोव्हेंबर महिन्यात थायलंडमध्ये होणाऱ्या ७४ व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत मनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी.
मूळची राजस्थानच्या श्री गंगानगरची असलेली मनिका सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मनिकाने गेल्या वर्षी 'मिस युनिव्हर्स राजस्थान'चा किताब जिंकला होता. मनिका केवळ एक सौंदर्यवती नसून एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. ती 'न्यूरोनोव्हा' या संस्थेची संस्थापक आहे. या माध्यमातून ती न्यूरोडायव्हर्जन्स, म्हणजेच एडीएचडी सारख्या मानसिक स्थितींबद्दल समाजात असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी काम करते.
मनिका एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. यापूर्वी तिने परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत 'बिमस्टेक सेवोकोन'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एक उत्कृष्ट वक्ता आणि कलाकार म्हणूनही तिची ओळख आहे. ललित कला अकादमी आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या नामांकित संस्थांनी तिचा सन्मान केला आहे. ती राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट राहिली आहे. यासोबतच ती एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आणि चित्रकार आहे.
'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा मुकूट डोक्यावर चढल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मनिका म्हणाली, "माझा प्रवास गंगानगर शहरातून सुरू झाला. मी दिल्लीत येऊन या सौंदर्य स्पर्धेसाठी खूप तयारी केली. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली आणि या टप्प्यापर्यंत पोहोचवलं, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. ही स्पर्धा म्हणजे एक वेगळंच विश्व आहे. इथे आपलं व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य घडतं. ही जबाबदारी केवळ एका वर्षाची नसून आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहील."
'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' स्पर्धेसाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला परीक्षक म्हणून उपस्थित होती. मनिका विश्वकर्माच्या विजयाने तिने आनंद व्यक्त केला. उर्वशी म्हणाली, "स्पर्धा खूपच चुरशीची आणि कठीण होती, पण अखेर आपल्यासोबत एक योग्य विजेती आहे. मनिका विजेती झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आता मिस युनिव्हर्समध्ये ती भारताला अभिमान वाटेल असा क्षण नक्की देईल.”