नवी दिल्ली : देशभरात वाढत्या कोविड-१९ रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांना आता आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. बुधवारी भारतातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ७ हजार पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
केरळमध्ये एका दिवसात सर्वाधिक १७० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे तेथील सक्रिय रूग्णांची संख्या २,२२३ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये ११४ नवीन रुग्णांसह १,२२३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये १०० नवीन रुग्ण आढळल्याने एकूण ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीत ६६ रुग्ण आढळल्याने शहरातील एकूण रुग्णसंख्या ७५७ वर पोहोचली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशात सक्रिय कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असून आज ७ हजार च्या पुढे रूग्णसंख्या गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.