

Gym Extramarital Case : दाम्पत्याच्या लग्नबंधनाला तब्बल २७ वर्षे पूर्ण झाली. मात्र काही दिवसांपासून पत्नीचे वर्तन कमालीचे बदल्याचे व्यावसायिक पतीच्या निदर्शनास आले. पत्नीचे जिम ट्रेनरसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याचा संशय होता. हे गुपित उघड करण्यासाठी त्याने चक्क राहत्या घरात छुपा ऑडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइस बसवले. त्याचा संशय खरा ठरला. आता याप्रकरणी पतीने पुराव्यांसह न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालनाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
अहमदाबादमधील व्यावसायिक पतीने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या पत्नीची जिम ट्रेनरशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पती घरात नसताना तो वारंवार त्यांच्या घरी यायचा. तसेच, ते दोघे फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे सतत एकमेकांच्या संपर्कात असायचे, असा आरोप पतीने केला आहे.
पत्नीच्या बदललेल्या वर्तनामुळे आणि शेजाऱ्यांसह त्यांच्या दोन मुलांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे पती सावध झाला. त्यानंतर त्याने घरात गुपचूप ऑडिओ रेकॉर्डिंग सिस्टीम बसवली. या रेकॉर्डिंगमध्ये पत्नी आणि तिच्या मित्राच्या अशा काही गोष्टी समोर आल्या. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची पुष्टी झाली, असा दावा पतीने केला आहे. इतकेच नव्हे तर, पतीने त्यांचा पाठलाग केला असता ते दोघे कारमध्ये एकत्र आढळून आले होते, असेही तक्रारीत म्हटले आहे.
पत्नीच्या नावावर आणि संयुक्त मालकीचे असलेल्या बँकेच्या लॉकरमधील मौल्यवान दागिने व वस्तू लंपास केल्या जाऊ शकतात, अशी भीती पतीला होती. त्यामुळे त्याने तातडीने दिवाणी न्यायालयात धाव घेऊन ते बँक लॉकर फ्रीज (वापरावर बंदी) करण्याचे आदेश मिळवले.
बँक लॉकर सील झाल्यानंतर पत्नीच्या प्रियकराने पतीला फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. घरात रेकॉर्ड केलेले सर्व ऑडिओ पुरावे आपल्या हवाली कर आणि हा वाद मिटव, अशी धमकी त्याने दिली. पतीने ऐकले नाही, तर त्याला १ कोटी रुपयांच्या खोट्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारी म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास आणि नैराश्याचा सामना करावा लागला असून, समाजात कुटुंबाची मोठी नाचक्की झाली आहे, असे पीडित पतीने न्यायालयात सांगितले सांगितले. यापूर्वी पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला, असे पतीने आपल्या अर्जात म्हटले आहे. कोर्टाने आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांना ३० दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.