

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mamata Banerjee on Murshidabad Violence | भारताच्या प्रगतीत सर्व धर्माच्या लोकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु सध्या संविधान कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. मुर्शिदाबादमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. बुधवारी वक्फ सुधारणा कायद्याच्या संदर्भात कोलकाता येथे मुस्लिम धर्मगुरूंसोबतच्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने इतक्या घाईघाईत वक्फ कायदा का मंजूर केला? त्यांना बांगलादेशातील परिस्थिती माहित नाही का? बंगालमध्ये दंगली घडवण्यासाठी तुम्ही केंद्रीय एजन्सींचा वापर करून बाहेरून लोकांना बोलावले नाही का? बीएसएफने मुर्शिदाबादमधील हिंसाचार का थांबवला नाही? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला.
बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांवर नियंत्रण ठेवावे. ते आमच्याविरुद्ध एजन्सींचा वापर करत आहेत. मोदींनी कोणत्याही अत्याचारी कायद्यांना परवानगी देऊ नये. मुर्शिदाबाद हिंसाचारात बांगलादेशचा सहभाग असेल तर त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. बीएसएफ सीमेची काळजी घेते, राज्य सरकार नाही.
भाजपने रामनवमी दरम्यान दंगल घडवण्याची योजना आखली होती, पण ती अयशस्वी झाली, असा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. मी लोकांना फूट पडू देणार नाही. आम्ही सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवतो. मला एकता हवी आहे. केंद्रातील भाजपला सत्तेवरून हाकलून लावल्यानंतर, आम्ही त्यांनी आणलेली सर्व जनविरोधी विधेयके मागे घेऊ. सर्व धार्मिक नेत्यांनी लोकांमध्ये एकतेचा संदेश द्यावा. सर्वांनी एकत्र राहणे खूप महत्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्राने किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत याचे उत्तर द्यावे? औषधे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, पण फक्त बंगालविरुद्धच बोललं जातं. बंगालचे खोटे व्हिडिओ दाखवले जातत. कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधील ८ व्हिडिओ बंगालमधील म्हणून दाखवले गेले. यामुळे बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, असा दावा बॅनर्जी यांनी केला.