

Mallikarjun Kharge on Shashi Tharoor
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीपर भाष्य केल्याने चर्चेत आलेल्या काँग्रेस खासदार डॉ. शशी थरूर यांच्याभोवती काँग्रेसमध्ये मतभेदाचे वादळ उठले असले तरी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खर्गे यांनी थरूर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, पण काहीजण म्हणतात मोदी प्रथम, राष्ट्र नंतर – अशा लोकांचं आपण काय करणार?”
खरगे पुढे म्हणाले, "थरूर यांना इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान आहे, म्हणून त्यांना CWC (काँग्रेस कार्यकारी समिती) मध्ये स्थान देण्यात आलं. प्रत्येक सदस्याचा आपापला दृष्टिकोन असतो. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे – आम्ही देशासाठी एकत्र आलो आहोत आणि एकत्र लढत राहू."
‘ऑपरेशन सिंदूर’ या भारताच्या आंतरराष्ट्रीय राजनयिक मोहिमेनंतर, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची स्तुती करणारा लेख शशी थरूर यांनी ‘द हिंदू’ मध्ये लिहिला होता.
यात त्यांनी लिहिलं होते की, “पंतप्रधान मोदी यांची उर्जा, सळसळ, आणि आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची तयारी ही भारतासाठी एक मोठी ताकद आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने एकजूट होऊन जागतिक स्तरावर आपली भूमिका ठामपणे मांडली.”
या विधानांवरून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी थरूर यांच्यावर टीका केली. पवन खेरा, उदित राज यांच्यासह काही नेत्यांनी थरूर यांची मोदी सरकारच्या मोहिमेत निवड होणे पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असल्याचं म्हटलं.
या सर्व पार्श्वभूमीवर, थरूर यांनी स्पष्ट केलं की, "मी मोदी यांची स्तुती केली असली तरी, भाजपमध्ये जाण्याचा माझा कोणताही विचार नाही. माझं मत वैयक्तिक आहे आणि ते देशहिताच्या दृष्टीने आहे."
काँग्रेसमध्ये वैचारिक स्वातंत्र्य?
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी थरूर यांच्या विधानांपासून पक्ष स्वतःला दूर ठेवत म्हटलं, "सर्व CWC सदस्यांना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही राष्ट्राच्या रक्षणासाठी कार्यरत आहोत."
थरूर यांच्या मोदीवरील स्तुतीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वैचारिक मतभेद स्पष्ट झाले आहेत. काहींनी थरूर यांची भूमिका "मोदी-समर्थक" असल्याचे म्हटले, तर काहींनी त्यांचे वक्तव्य "राष्ट्रीय दृष्टिकोनातून केलेले" असे मानले.
शशी थरूर यांची मोदी स्तुती ही काँग्रेससाठी एक डावपेचात्मक आव्हान ठरू शकते. पक्ष एका बाजूला राष्ट्रीय एकतेचा मुद्दा मांडत असताना, दुसऱ्या बाजूला पक्षातील काही नेते थेट सत्ताधारी नेतृत्वाचे कौतुक करत आहेत.
अशा वेळी काँग्रेसपुढे नेतृत्व एकसंध ठेवणे आणि वैचारिक असंतोष हाताळणे हे मोठे आव्हान असणार आहे.