

नवी दिल्ली : "महाराष्ट्रात कुठलाही नवीन पक्ष एनडीएमध्ये येणार नाही आणि शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार आम्ही तोडणार नाही," असे स्पष्ट वक्तव्य प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गेले काही दिवस शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये येणार असल्याचे जोरदार चर्चा आहेत. काही बड्या नेत्यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका झाल्या त्याबरोबरच अनेक गोष्टी झाल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य करत या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिला. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनडीएमध्ये महाराष्ट्रात कोणताही नवा पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहे तेच पक्ष राहतील. आम्ही आमच्या कोणत्याही मित्रपक्षाला सोडणार नाही. शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार यांना आम्ही तोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "संसदेच्या आगामी अधिवेशनात केंद्र सरकारद्वारे विविध महत्त्वाची विधेयके आणले जाण्याची शक्यता आहे. यातील काही विधेयकांना दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. सध्या हे बहुमत सत्ताधारी एनडीएकडे नाही. अशावेळी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी एनडीएची मदत करण्याची शक्यता आहे."
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदार भाजप सोबत येणार असल्याच्या चर्चा होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आणि शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार यांना आम्ही तोडणार नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे पक्ष म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये येण्याची दारं बंद झाली आहेत. तरीही त्यांना एनडीएमध्ये यायचेच झाल्यास ज्याप्रमाणे ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून सत्तेत आले त्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माध्यमातून त्यांनाही सत्तेत येता येईल. मात्र हा मार्ग अवलंबण्यासाठी देखील भाजपमधील वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवणे आवश्यक आहे.