

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
मागील काही दिवसांपासून सतत बदलत्या हवामानाचा मारा झेलत हापूस आता बाजारात दाखल झाला आहे. कोकणात येताना वडखळ नाक्यापासूनच रस्त्याच्या ठिकठिकाणी स्टॉल लावून बागायतदार हापूस विकताना दिसत आहेत.
हापूसची चव चाखणे सध्यातरी सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्याच्या अस्सलतेचा भाव ही पाचशे रुपये डझन असल्याने रायगडचा हापूस चांगलाच भाव खाताना दिसत आहे.
फळाच्या आकारानुसार या किंमती असून चविष्ट आंबा डझनाला पाचशे रुपये डझनाचा भाव खात आहे. हापूसची आवकही कमी असल्याने लवकर पीक घेणार्या बागायतदारांना चांगला नफा मिळत आहे. हापूसची आवक वाढल्यानंतर या किमती कमी होतील, असे या बागायतदार विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आदींमुळे आंब्याचे पीक या वर्षी कमालीचे घटले, फवारणीपासून प्रत्यक्षात बाजारपेठेत तयार झालेली फळे पाठवण्यापर्यंतचा खर्च अव्वाच्या सच्चा होत आहे. या सार्या जडण-घडणीच्या तुलनेत कमी मिळत असल्याने बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या तयार झालेला आंबा मुंबई, पुणे बाजारपेठेमध्ये पाठवून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यावर व्यापारी बागायतदारांचा भर आहे.
अलिबागच्या हापूसला चांगला भाव मिळत आहे. साधारण साडेपाचशे रुपये दर असल्याने स्थानिक बाजारातही त्या किमतीपेक्षा कमी भावाना येथील शेतकर्यांची तयारी नाही. साधारण अक्षयतृतियेच्या नंतर आवक वाढेल. रायवळी, पायरी आंब्यांचा पर्याय उपलब्ध झाल्यावर हापूसच्या किमती उतरतील.
मयुर पाटील, आंबा विक्रेता
एप्रिल महिना उजाडला तरी या वर्षी अद्यापही येथील स्थानिक बाजारपेठेत मोठया प्रमाणात आंबा विक्रीसाठी दाखल झालेला नाही. सर्वसामान्यांचा जा म्हणून ओळखला जात असलेला रायवळ, पायरी आंबाही स्थानिक बाजारपेठेत दाखल नाही. त्यामुळे सर्वसामान्य मात्र हापूसच्या चवीपासून काहीसे दूरच राहिलेले दिसत आहेत.