महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे माझ्या कामाचा सन्मान : राम सुतार
प्रशांत वाघाये
नवी दिल्ली : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला. यापूर्वी त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. संसद भवन, राष्ट्रपती भवन यांसह देश-विदेशात त्यांनी बनवलेले पुतळे पाहायला मिळतात. जगाच्या पाठीवर अनेक पुतळे त्यांनी आजवर बनवले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी दै 'पुढारी'शी विशेष संवाद साधला. 'पुढारी'चे नवी दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत...
प्रश्न: महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला. ही बातमी ऐकल्यानंतर आपल्या काय भावना आहेत?
उत्तर: मी मुळ मराठी आहे, महाराष्ट्राचा आहे. काम करून दिल्लीत पोचलो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची बातमी ऐकल्यानंतर मला खुप आनंद झाला. केवळ मलाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला या गोष्टीचा आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाचा सन्मान आहे, गौरव आहे, असे मी समजतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो.
प्रश्न: आज गावाकडची आठवण येते का?
उत्तर: निश्चित! गावाकडची आठवण तर येतेच. माझ्या बालपणीच्या असंख्य आठवणी आहेत. कामाच्या निमित्ताने मी दिल्लीत लवकर आलो, इथ स्थिरावलो. मात्र बालपणी धुळे जिल्ह्यातील गुंदूर गावात खेळत बागडत होतो. मधुसूदन कुलकर्णी हे माझे शिक्षक होते. त्यांच्यासाठी मी गणेशमूर्ती तयार केली होती. जोशी नावाचे चित्रकलेचे शिक्षक होते त्यांनी मला सर्वप्रथम गांधींचा पुतळा बनवायला सांगितला होता.
प्रश्न: आजवर अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात, कसा अनुभव होता?
उत्तर: हो, आजवर विविध राष्ट्रपती, पंडीत नेहरूंपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक क्षेत्रातील लोकांना, अनेक नेत्यांना भेटता आले. सगळ्यांनीच देशासाठी काम केले. त्याच क्रमात आज पंतप्रधान मोदीही जगाच्या पाठीवर देशाची प्रतिमा मोठी करण्यासाठी काम आहेत. आमचा संबंध माझ्या कामासंदर्भात यायचा, कामासंबंधी किंवा एखादी संकल्पना आणि त्याची निर्मिती यासंदर्भात चर्चा व्हायची.
प्रश्न: आजवर तुम्ही एवढे काम केले, आणखी कुठले काम विशेषतः महाराष्ट्रात व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे?
उत्तर: शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा असावा, अशी माझी भावना आहे. सरकारने तसा पुढाकार घेतला आणि तशी जबाबदारी दिली तर मला तो पुतळा तयार करायला आवडेल.
प्रश्न: तुम्ही बनवलेल्या अनेक कलाकृतींमध्ये तुम्हाला आवडलेली कलाकृती कोणती?
उत्तर: आजवर मी अनेक पुतळे बनवले, सर्वच उत्तम आहेत. मात्र महात्मा गांधींचा पुतळा विशेष वाटतो. लहानपणापासून त्यांचा एक वेगळा प्रभाव माझ्यावर राहिला. महात्मा गांधींचा विचार मला खूप भावतो मी ५ वर्षांचा होतो. तेव्हा महात्मा गांधी आमच्या गावात आले होते. विदेशी कपड्यांची होळी होणार होती, माझ्या डोक्यावर एक विदेशी टोपी होती, तीही त्यावेळी जाळली होती.. गांधींच्या विचारांची गरज आज देशाला आणि जगालाही आहे.
प्रश्न: तुम्ही बनवलेला पहिला पुतळा किंवा फार पूर्वीच्या कोणत्या कलाकृती आठवतात?
उत्तर: अगदी तरुण वयात मी कामाला सुरुवात केली. १९४८ मध्ये मी महात्मा गांधींचा पहिला पुतळा बनवला होता. अनेक वर्षांपूर्वी एक गणेशमुर्ती तयार केली होती. एक शेतकऱ्याचा आणि बॉडी बिल्डरचा पुतळा बनवला होता.
प्रश्न: तुम्ही जे पुतळे बनवता त्यांचे खास आकर्षण लोकांना असते. यामागे काय वैशिष्ट्य आहे?
उत्तर: कुठलाही पुतळा हा त्या त्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असावा लागतो. महात्मा गांधींचा पुतळा हा शांत, संयमी दिसतो. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शत्रूला धडकी भरावी आणि शत्रूने वाकड्या नजरेने आपल्याकडे बघू नये, असा असतो. प्रत्येक व्यक्तीची वैशिष्ट्य असतात. ती वैशिष्ट्ये पुतळ्याकडे बघताना जाणवली पाहिजेत. तसा प्रयत्न विशेषत्वाने असतो.
प्रश्न: तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता?
उत्तर: मला शाळेत असतानाही कलाकृती तयार करणे, चित्र काढणे, मूर्ती बनवणे आवडत होते आणि मी ते करत होतो. पुढे मी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवीचे शिक्षण घेतले. ५ वर्षांची पदवी मला ४ वर्षात मिळाली. पहिल्या वर्षी थेट दुसऱ्या वर्षाला मला प्रवेश मिळाला होता. पुढे सुवर्णपदकही मिळाले. त्यानंतर मी कामाला सुरुवात केली. वर्षभर केंद्र सरकारसोबतही काम केले. मात्र त्यानंतर पुन्हा स्वतंत्र कामाला सुरुवात केली.
प्रश्न: तुमचे पुत्र अनिल सुतार तुमच्यासोबत काम करतात, मुलाबद्दल काय वाटते?
उत्तर: आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आम्ही म्हणजे आर्ट आणि आर्किटेक्चर अशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. अनिलला या कामात आवड आहे. तोही चांगले काम करतो. अनेक वेळा काही मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो. त्यानेही चांगले शिक्षण घेतले. काही वर्षे अमेरिकेत काम केले. आता तोही भारतात माझ्यासोबत काम करत आहे.

