

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सर्वोच्च २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२०) विधानसभेत केली. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिल्पकलेच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना या आधी पद्मश्री (१९९९) आणि पद्मभूषण (२०१६) पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
राम वनजी सुतार भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बवनवण्याचा विक्रम आहे. 100 वर्षांचे असलेल्या सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झाला आहे. देशातील अनेक महत्वाचे पुतळे त्यांनी बनविले आहेत. इंदू मिल इथल्या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सिंधुदुर्ग इथला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम त्यांच्याकडे सुरू आहे.
राम सुतार यांनी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९५२ साली शिल्पकलेची पदवी प्राप्त केली. यावेळी त्यांना मेयो सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी १९५४ ते १९५८ या काळात औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागात काम केले. जिथे त्यांनी अजिंठा आणि वेरुळ येथील शिल्पांच्या जीर्णोद्धाराचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यानंतर १९५८-५९ मध्ये ते नवी दिल्लीतील माहिती व प्रसारण मंत्रालयात तांत्रिक साहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र, शिल्पकलेवरील प्रेमामुळे त्यांनी सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ शिल्पकार होण्याचा निर्णय घेतला.
चंबल माता (४५ फूट, गांधी सागर धरण)
महात्मा गांधींच्या मूर्ती (जागतिक स्तरावर)
स्टॅच्यू ऑफ युनिटी (१८२ मीटर, गुजरात)
महाराजा रणजित सिंग यांचा अश्वारूढ पुतळा (२१ फूट, अमृतसर)
अयोध्येतील राम मंदिरासाठी भगवान राम यांची मूर्ती (प्रस्तावित)
राम सुतार यांनी आपल्या कलेतून भारतीय इतिहास आणि संस्कृतीला अमर केले असून, त्यांचे योगदान पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील.
राम सुतार यांचे ब्राँझ धातूमधील शिल्पकामावर प्रभुत्व आहे. त्यांच्या शिल्पांमध्ये प्रमाणबद्धता आणि सूक्ष्मता यांचा उत्कृष्ट संगम दिसतो. मध्य प्रदेशातील गांधी सागर धरणावरील ४५ फुटी 'चंबल माता' हे पहिले शिल्प त्यांनी साकारले. हे शिल्प एकाच साच्यात कोरलेले आहे. या शिल्पाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली.