Jain Minority Development : जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाला १०० कोटींचा निधी

९ जुलैला दिल्लीत देशभरातील जैन समाजाच्या नेत्यांची बैठक, विविध प्रश्नांवर होणार मंथन
Fund
FundPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाने भारत सरकारच्या राष्ट्रीय महामंडळासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला असून या कराराअंतर्गत महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जैन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला चालना देण्याबरोबरच युवकांच्या नवउद्योगांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच उद्योग, धार्मिक आणि सामाजिक विकासाशी संबंधित विविध उपक्रमांसाठीही या निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ललित गांधी यांनी सांगितले की, राज्य सरकारकडूनही महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. त्यामुळे शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी इच्छुक युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच, जैन समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये सर्व समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, वसतीगृहे आणि अन्य सामाजिक उपक्रम उभारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील जैन समाजाचा सहभाग निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून समाजोपयोगी प्रकल्पांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा उद्देश असल्याचे गांधी यांनी सांगितले.

देशभरातील जैन समाजासमोरील विविध आव्हाने, प्राचीन तीर्थक्षेत्रांचा विकास, धार्मिक स्थळांचे संरक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ९ जुलै रोजी नवी दिल्ली येथे विविध राज्यांतील जैन समाजाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील जैन समाजाच्या समस्या आणि भविष्यातील धोरणांवर सविस्तर मंथन होणार आहे.

मुंबईत अलीकडे धार्मिक स्थळांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले. काळानुरूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, यावरही विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक स्थळांच्या संरक्षणाबाबत बोलताना गांधी म्हणाले, जैन समाजाच्या प्राचीन धार्मिक स्थळांचे जतन आणि संरक्षण करणे ही काळाची गरज असून, त्यासाठी दिल्लीत विविध स्तरांवर मंथन सुरू आहे. मुंबईतील कबुतरखाना वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, अहिंसा आणि जीवदया ही जैन धर्माची मूलभूत तत्त्वे आहेत. मात्र, या मूल्यांचे पालन करताना इतर समाजाला कोणताही त्रास होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबईतील कबुतरखान्याचा वाद हा राजकीय हेतूने निर्माण करण्यात आला असून, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे, असेही ललित गांधी यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news