Kumbh Mela stampede |
प्रयागराज : कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या शाही स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. एकदा नुकसानभरपाई जाहीर केल्यानंतर ती वेळेत व सन्मानाने देणे हे राज्य सरकारचे बंधनकारक कर्तव्य असल्याचे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले.
राज्याचे वर्तन असक्षम आणि नागरिकांच्या दुर्दशेबद्दल उदासीनता दर्शवते, असे म्हणत न्यायालयाने भरपाई जाहीर केल्यानंतर, वेळेवर रक्कम देणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे खडसावत राज्यसरकारवर ताशेरे ओढले. प्रयागराज येथील सरकारी मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजने कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील एका पीडितेचा मृतदेह शवविच्छेदन न करता कुटुंबियांना सुपूर्द केल्याबद्दलही न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या मृत महिलेच्या पतीने भरपाईसाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंह आणि न्यायमूर्ती संदीप जैन यांच्या खंडपीठाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. "जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही रुग्णालयात दाखल केले गेले असेल, तर सरकारी संस्थांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तेच दिसून आले पाहिजे आणि ते याचिकाकर्त्याला कळवले पाहिजे. जर कोणत्याही रुग्णाला मृतावस्थेत रुग्णालयात आणले गेले असेल, तर ते निवेदन देखील नोंदवले पाहिजे आणि संबंधितांना कळवले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत, याचिकाकर्त्याला कळवले पाहिजे होते की, कोणत्या रुग्णालयातून आणि कोणत्या परिस्थितीत, त्याच्या पत्नीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. जर तो मृतदेह कोणत्याही ठिकाणी बेवारस अवस्थेत आढळला असता, तर मृतदेह सापडल्यानंतर योग्य ती पोलिस कारवाई केली पाहिजे होती किंवा त्यानंतर कारवाई केली पाहिजे होती. त्या संदर्भात कोणतही तथ्य उघड झालेल नाही."
फेब्रुवारीमध्ये मृतदेह सोपवण्यात आला पण मृताच्या कुटुंबाला कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. याबद्दल न्यायालयाने अतिशय लाजीरवाणे असल्याचे म्हटले आहे. नागरिकांची चूक नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने म्हटले की, नागरिकांना अशा अनपेक्षित नुकसानाला सामोरे जावे लागले तर, उपाययोजना आणि काळजी घेणे राज्याचे कर्तव्य आहे.
२८ जानेवारी २०२५ ते कुंभमेळा संपेपर्यंत झालेल्या सर्व मृत्यू आणि पीडितांची वैद्यकीय माहिती
प्रयागराजमधील अनेक वैद्यकीय संस्था आणि अधिकाऱ्यांना याचिकेत पक्षकार म्हणून सहभागी करून घ्यावे
ज्या रुग्णालयांमध्ये मृतदेह आणण्यात आले, त्याची संपूर्ण माहिती
मृत घोषित केलेल्या किंवा वैद्यकीय उपचार केलेल्या व्यक्तींची माहिती, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती
राज्यसरकारकडून प्रलंबित नुकसान भरपाईची माहिती