

Vantara Mahadevi Elephant Update
जामनगर : वृत्तसंस्था
'महादेवी' हत्तिणीच्या उज्ज्वल भवितव्य आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन 'वनतारा'चे सीईओ विवान करणी यांनी नांदणीवासीयांसह समाज बांधवांना केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच आमच्या प्रकल्पात 'महादेवी' आणण्यात आली आहे. आम्ही 'महादेवी' हत्तिणीची कधीही मागणी केली नव्हती. याप्रकरणी ११ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी 'वनतारा'ला बांधील असेल, असे 'वनतारा'चे सीईओ विवान करणी यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच स्वतिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामधून जामनगर येथील 'वनतारा' या पशुकल्याण संस्थेत 'महादेवी ऊर्फ माधुरी' हत्तिणीचे स्थलांतर करण्यात आले आहे, असे करणी यांनी पत्रकात म्हटले आहे.
'महादेवी' आजारी आहे. तिला उत्तम चांगल्या उपचारांची गरज आहे. तिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच 'वनतारा'चा मुख्य आणि मूळ हेतू आहे. आजारातून बरी करून तिला नैसर्गिक आयुष्य लाभावे, यासाठी 'महादेवी'चा सांभाळ, पालन करण्याची जबाबदारी न्यायालयाने आमच्यावर सोपवली आहे. आम्ही 'महादेवी'ला आमच्याकडे द्या, अशी कधीही मागणी केली नव्हती, असेही 'वनतारा 'ने पत्रकात म्हटले आहे.
जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आमची त्याबाबत मनापासून सहानुभूती आहे. म्हणूनच, आम्ही जैन मठ व स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. शांततामयमार्गे 'महादेवी' च्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचादेखील सन्मान राखला जाईल. मात्र, 'महादेवी'ला प्राणी म्हणून स्वतंत्र आणि नैसर्गिक आयुष्य मिळाले पाहिजे. तिचे हक्क तिला मिळाले पाहिजेत, तिच्या चाहत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
'महादेवी'सोबत असलेल्या जनतेच्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी 'वनतारा'लाही खूप आदर आहे. 'महादेवी'ची मठातील उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती. 'वनतारा' कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, असेही 'वनतारा 'चे सीईओ विवान करणी यांनी स्पष्ट केले आहे.