

सिधी : टेलिकॉम, कोळसा असे घोटाळे करून काँग्रेसने देशाची लूट केली. काँग्रेसचे खरे घोषवाक्य आहे… 'काम हाफ, खिसा साफ'! पैसा गरिबांच्या उद्धारावर खर्च झाला पाहिजे, पण काँग्रेसचे नेते स्वत:च्या 7 पिढ्यांचा उद्धार करण्यावर तो खर्च करतात, अशी घणाघाती टीका करून सरकार आणि गरीब यांच्यादरम्यान मध्यस्थांना जो एक पैसा लुबाडू देत नाही, तो जनसेवक म्हणजे मोदी अशी स्वत:ची व्याख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. अनुदानाची रक्कमही शेतकर्यांच्याही थेट खात्यात भरण्याचा निर्णय आम्ही म्हणूनच घेतला, असेही ते म्हणाले.
एका सभेतून साधल्या 30 जागा
सिधीची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. भाजपने विद्यमान आमदार केदारनाथ शुक्ला यांचे तिकीट रद्द करून खासदार पाठक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोदींची ही सिधी सभा विंध्याचलच्या 30 जागांसाठी प्रभावी ठरेल, असे सांगण्यात येते.
मोदींचे 4 मुद्दे
1. गंभीर आरोप : काँग्रेसने 10 वर्षांत गरीब आणि मध्यमवर्गीयांना लुबाडण्याचे काम केले. कोळसा घोटाळ्यात कोट्यवधी लुटले. मोदींनी निष्ठेने काम केले म्हणून घोटाळ्यांचेच वाटोळे झाले, ते कुठे दिसतच नाहीत.
2. आम्ही खात्रीशीर : मोदींकडून ही गॅरंटी आहे, की देशातील कुणीही गरीब उपाशी झोपणार नाही. डिसेंबरपर्यंत मोफत धान्यवाटप होईल. पुढेही 5 वर्षे ते सुरू राहील. काँग्रेस नेते त्यांच्या कुटुंबावर खर्च करतात, आम्ही जनतेवर खर्च करतो.
3. खड्ड्यातून वरच : काँग्रेसने मध्य प्रदेशला खड्ड्यात घातले होते. आम्ही वर काढले. आता केवळ वर जायचे आहे. खाली यायचे नाही. तसे काही घडायलाही नको. तुमच्या हातात सारे आहे.
4. आकडे बोलतात : सरकारने गरिबांच्या घरांसाठी 4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. राम मंदिराची उभारणी सुरू आहे. त्याचीच चर्चा लोक करतात, पण 4 कोटी कुटुंबांची घरभरणीही आम्ही करतोच आहोत.