

Lucknow Triple Murder Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील तिहेरी हत्याकांडाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सआदतगंज परिसरात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये आरोपी ऋषभ शुक्ला भररस्त्यात गोळीबार करताना दिसत आहे.
गोळीबार सुरू असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या किंकाळ्याही ऐकू येत आहेत. विशेष म्हणजे, व्हिडीओमध्ये ‘पप्पा-पप्पा’ असा आर्त आवाजही ऐकायला येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेशी संबंधित आणखी एका व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी आरोपी ऋषभ शुक्लाला ताब्यात घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सआदतगंज पोलीस ठाण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गोळीबाराचा थरार आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई, या दोन्हींचे दृश्य आता समोर आले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आरोपी ऋषभ शुक्लाला जमिनीवर पाडून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, या झटापटीदरम्यान आरोपी उठतो आणि गोळीबार करू लागतो. त्याला पकडण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती खाली कोसळते. त्यानंतर आरोपी दुसऱ्या व्यक्तीच्या दिशेनेही गोळ्या झाडताना दिसतो.
व्हिडीओमध्ये सलग दोन ते तीन गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येतो. याचवेळी घटनास्थळी असलेल्या व्यक्तींची आरडाओरडही ऐकायला मिळते. ‘पप्पा-पप्पा’ अशी आर्त हाक मारल्याचा आवाजही व्हिडीओमध्ये आहे.
ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास लखनऊमधील सआदतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मण टोला, नौबस्ता परिसरात घडली होती. घराबाहेर ओटा बांधण्यावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले. या घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये ६२ वर्षीय शिवाजी तिवारी, त्यांचे भाऊ शिवेंद्र तिवारी आणि सुयश तिवारी यांचा समावेश आहे. शिवाजी तिवारी हे सचिवालयातून निवृत्त झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी तिवारी आणि त्यांचे शेजारी ऋषभ शुक्ला यांच्यात घराबाहेरील वडाच्या झाडाजवळ ओटा बांधण्यावरून यापूर्वीपासून वाद सुरू होता. सोमवारी सुयशने वडाच्या झाडाखाली आपली कार उभी केली. यावरून पुन्हा दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले आणि गोळीबारात तिघांचा जीव गेला.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी ऋषभ शुक्लाला घटनास्थळावरूनच अटक केली होती. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ऋषभ शुक्लासह त्याचे वडील, भाऊ आणि बहिणीचेही नाव नमूद करण्यात आले आहे. ओटा बांधण्यावरून सुरू झालेला शेजाऱ्यांमधील वाद अखेर तिहेरी हत्याकांडापर्यंत पोहोचला.