

Lucknow Sleeper Bus Fire |
दिल्ली : बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका स्लीपर बसला आग लागल्याने पाच प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले, तर अनेक जण आगीत होरपळल्याने जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी लखनऊमध्ये हा अपघात घडला. आगीचे नेमके कारण समजू शकलेलं नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब दाखल होत आगिवर नियंत्रण आणण्यात आले. मोहनलालगंजसह इतर अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ८० प्रवासी होते ते बिहारहून दिल्लीला जात होते. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघाताची वेळ पहाटे पाचच्या सुमारास असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी बसमध्ये सर्वजण झोपले होते.
आग लागल्यानंतर बस काही काळ जळत्या स्थितीत धावत राहिली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने काच फोडली आणि पळून गेले. आगीमुळे मुख्य दरवाजा अडकल्याने उघडत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. काहींनी काचा फोडून उड्या मारल्या. पीजीआय कल्लीजवळील किसान पथावर हा अपघात झाला. स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.