लोकसभा निवडणूक 2024 : शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

File Photo
File Photo

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (दि.30) सायंकाळी थंडावल्या. निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ५७ मतदारसंघात शनिवारी (दि.१) मतदान होणार आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश (१३) पंजाब(१३), पश्चिम बंगाल (९), बिहार (८) ओरिसा (६), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (३) आणि चंडीगडच्या एका जागेचा समावेश आहे. मतदान पार पडताच तिसऱ्या दिवशीच (दि.४) निवडणूक निकाल लागणार आहेत.

सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातही मतदान होत आहे. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून तर लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती बिहारच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. या टप्प्यात एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात भाजप आणि मित्र पक्षांच्या एनडीए आघाडीने ५७ पैकी ३२ जागांवर विजय मिळविला होता. यामध्ये एकट्या भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. विरोधी पक्षांना केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले होते. उर्वरित जागांवर अपक्ष व इतरांनी विजय मिळविला होता.

शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी जाहीर सभा, रॅली, रोड शो या माध्यमातून आपल्या पक्षासाठी जोरदार प्रचार केला. कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी पंजाबमध्ये रॅली काढली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे 'रोड शो' करून काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका रॅलीला संबोधित केले.

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाबच्या अमृतसर, फरीदकोट, रूपनगर येथे रॅली काढून वातावरण तापविले. राहुल गांधी यांनी पंजाबच्या आनंदपूरसाहिब मतदारसंघात प्रचार अभियान राबविले. काँग्रेससाठी पंजाब महत्वपूर्ण राज्य आहे. २०१९ च्या निवडणुकीत १३ पैकी ८ जागा जिंकून काँग्रेसने ४०.१२ टक्के मते मिळविली होती. प्रियांका गांधी वधेरा यांनी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे 'रोड शो केला. २०१९ मध्ये चारही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला होता. यंदा मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील हिमाचल सरकारच्या कामामुळे काँग्रेसला विजयाची अपेक्षा आहे.

या आहेत "हाय प्रोफाईल लढती :

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (भाजप) विरुद्ध अजय राय (इंडिया आघाडी)
गोरखपूर : रवि किशन (भाजप) विरुद्ध काजल निषाद ( इंडिया आघाडी)
गाजीपूर : पारसनाथ राय- (भाजप) विरुद्ध अफजाल अंसारी ( इंडिया आघाडी)
मंडी : कंगना रनौत (भाजप) विरुद्ध विक्रमादित्य सिंह (काँग्रेस)
पटना साहिब : रविशंकर प्रसाद (भाजप)- अंशुल अभिजीत (इंडिया आघाडी)
बठिंडा : परमपाल कौर सिद्धू (भाजप) – हरसिमरत कौर बादल (अकाली दल)
चंडीगड : संजय टंडन (भाजप)- मनीष तिवारी (काँग्रेस)
डायमंड हार्बर : अभिजीत दास (भाजप) – अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news