Lok Sabha Election 2024 Results : उत्तर प्रदेशात ‘योगी फॉर्म्युला’ झाला फेल; ‘सप’ची सरशी

Lok Sabha Election 2024 Results : उत्तर प्रदेशात ‘योगी फॉर्म्युला’ झाला फेल; ‘सप’ची सरशी

देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 80 लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशकडे प्रत्येक निवडणुकीचे पारडे फिरवण्याची क्षमता असल्याने साहजिकच सर्व राजकीय पक्षांचे आणि देशाचेही लक्ष या राज्याकडे लागून असते. याच राज्याने देशाला पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान दिलेले आहेत.

स्वतः मोदी येथीलच वाराणसीमधून तिसर्‍यांदा लोकसभा निवडणूक लढवत होते. राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करिश्माही वाढला असल्याचा बोलबाला होता. विशेषतः अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनंतर तर भाजपच्या बाजूने मोठीच हवा असल्याचे दाखवले जात होते. विविध एक्झिट पोलनीही उत्तर प्रदेश यावेळी पुन्हा एकदा भाजप व 'एनडीए'ला साथ देणार असेच दर्शवले होते. वास्तविक मात्र 4 जूनच्या निकालाने भाजपची व 'एनडीए'चीही मोठीच निराशा केली. याउलट समाजवादी पक्षाने अनपेक्षित अशी मुसंडी मारून दाखवली, तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जणू काही निष्क्रियच असलेल्या मायावती यांच्या 'बसपा'चा सुपडा साफ झाला.

यावेळी भाजप व आघाडीला 36, तर इंडिया आघाडीला 43 जागा मिळाल्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 62, सप-बसपा महागठबंधनने 17 आणि काँग्रेसने अवघी एक जागा मिळवली होती. यावेळी मात्र उत्तर प्रदेशसारख्या राज्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने भाजप-'एनडीए'च्या 'चारशे पार'च्या घोषणेला सुरूंग लागला, तर 'इंडिया' आघाडीला चमकदार आकडे दाखवण्यात यश आले. वाराणसीत अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड लाखांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

रायबरेलीमधून राहुल गांधी यांनी 4 लाख मताधिक्याने विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांना हरवून 'जायंट किलर' ठरलेल्या भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना यावेळी मात्र पराजयाचा सामना करावा लागला. सुल्तानपूरमध्ये मनेका गांधी समाजवादी पक्षाचे उमेदवार रामभुअल निषाद यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. लखनौमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा विजयी झाले. राज्याने 'एनडीए'च्या बाजूने 36 तर इंडिया आघाडीच्या बाजूने 43 जागा देऊन देशाच्या राजकारणावर परिणाम करणारा मोठा फेरफार दाखवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news