मायक्रोसॉफ्ट सर्व्हर आउटेजमुळे जगभरातील बँकांपासून विमान सेवेपर्यंतच्या सेवा विस्कळीत झाल्या. दरम्यान, जागतिक आउटेजच्या संदर्भात मायक्रोसॉफ्टने म्हटले की Azure क्लाउड सेवेतील व्यत्ययामागील मूळ कारण समजले आहे. Windows 365 वैयक्तिक संगणकांमधील समस्या CrowdStrike सॉफ्टवेअरच्या अलीकडील अपडेटमुळे झाली आहे. CrowdStrike Holdings चे सीईओ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत पोस्ट केली आहे. कंपनीने विंडोज सिस्टिम्समध्ये जागतिक आउटेज होण्याचे कारण शोधले आहे आणि त्याचे निराकरण केले गेले आहे. “ही सुरक्षा घटना अथवा सायबर हल्ला नाही.'' असे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनी म्हटले आहे.
अनेक ऑस्ट्रेलियातील वृत्तसंस्थांनी म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या बँकांतील संगणक सिस्टिम ठप्प झाल्याने मोठी गैरसोय झाली. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी बँक कॉमनवेल्थ बँकेने या समस्येची पुष्टी करत सेवा खंडित झाल्यामुळे ग्राहकांचा निधी हस्तांतरित करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडमधील काही बँकांना याच समस्येचा सामना करावा लागला. त्यांच्या सिस्टिम ऑफलाइन झाल्या.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग आउटेजनंतर एक 'गंभीर' स्वरुपाची ॲडव्हाजरी जारी केली आहे. CIAD-2024-0035 ने जारी केलेल्या या ॲडव्हाजरीमध्ये, प्रभावित सिस्टिम ड्रेडेड ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) समस्येचा सामना करत असल्याच्या मुद्यावर जोर दिला आहे. CERT ने प्रभावित झालेल्या सिस्टिम रिकव्हरीसाठी काही सूचना केल्या आहेत.
त्यात असे नमूद केले आहे की Crowd strike एजंट फाल्कन सेन्सरशी संबंधित Windows होस्ट आउटेज समस्येचा सामना करत आहेत. प्रोडक्टमध्ये नुकत्याच प्राप्त झालेल्या अपडेटमुळे क्रॅश होत आहेत. संबंधित विंडोज होस्ट्सना फाल्कन सेन्सरशी संबंधित ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ची समस्या जाणवत असल्याचे CERTने त्यांच्या ॲडव्हाजरीमध्ये म्हटले आहे. विंडोजला सेफ मोडमध्ये अथवा विंडोज रिकव्हरी वातावरणात Boot करा, असेही त्यात नमूद केले आहे.
'सर्व्हर आउटेज'मुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल २ वरील सेवा प्रभावित झाली.
स्पाइसजेटचे फ्लाइट अटेंडंटने म्हटले आहे की, "सिस्टीम अजूनही सुरू नाही. विमानांना विलंब होत आहे आणि प्रवाशांनाही अडचणी येत आहेत, आम्ही सर्वकाही हाताने लिहून ठेवले आहे. खूप गर्दी आहे. आम्ही हाताने लिहिलेले बोर्डिंग पास दिलेत. पण आम्ही परिस्थिती निभावून नेली आहे."
हैदराबाद ते कोलकाता असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हाताने लिहिलेला बोर्डिंग पास मिळाला आहे. CrowdStrike आउटेजमुळे भारतातील बहुतांश विमानतळावरील सेवांना फटका बसला असल्याचे एका यूजरने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
बँकांपासून ते विमानतळ आणि माध्यमांपर्यंत, जगभरातील अनेक ऑनलाइन सेवांना मोठ्या प्रमाणावर आउटेजचा फटका बसला आहे. अमेरिकेपासून ब्रिटन, भारतापर्यंत मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. विमानतळांवरील चेक-इन सिस्टम क्रॅश झाल्यामुळे जगभरात अनेक विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. तर ब्रिटनमधील स्काय न्यूज नेटवर्क ही माध्यमसेवा पूर्णपणे बंद झाल्याचेही माध्यमांनी वृत्तात म्हटले आहे.