नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी विजय नायर याची 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नायर याची पोलिस कोठडी संपल्याच्या पार्श्वभूमीवर तपास संस्थांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती. मात्र न्यायमूर्ती एम. के. नागपाल यांनी त्याला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली.
आम आदमी पक्षाच्या जनसंपर्क विभागाचा प्रभारी असलेला विजय नायर ओएमएल नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीदेखील चालवितो. केजरीवाल सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्यातला तो महत्त्वाचा आरोपी आहे. नायर याच्याविरोधात जे आरोप करण्यात आलेले आहेत, ते अतिशय गंभीर असल्याची टिप्पणी याआधीच्या सुनावणीवेळी विशेष न्यायालयाने केली होती. दिल्लीचे अबकारी धोरण तयार करण्यात नायर याची महत्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा आहे. नायर तसेच इतर आरोपींनी धोरण तयार करण्यापूर्वी मुंबई, दिल्ली, हैदराबाद तसेच इतर शहरांत मद्य निर्माते तसेच वितरकांच्या बैठका घेतल्याचे तपासात दिसून आले होते.
हेही वाचा