Law Student Murder | विधी शाखेच्या विद्यार्थिनीची भर वर्गात गोळी झाडून हत्या

पंजाबच्या तरनतारण येथील घटना : हल्लेखोर तरुणाचाही जीवन संपवण्याचा प्रयत्न; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Law Student Murder
Law Student Murder | विधी शाखेच्या विद्यार्थिनीची भर वर्गात गोळी झाडून हत्या
Published on
Updated on

तरनतारण; वृत्तसंस्था : पंजाबमधील तरनतारण येथील एका महाविद्यालयात आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. तरुणाने आपल्याच वर्गमैत्रिणीची भर वर्गात गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. माई भागो लॉ कॉलेजमध्ये सकाळी 9.15 च्या सुमारास घडलेला हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून की अन्य कोणत्या वादातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स राज (20) आणि संदीप कौर (19) हे दोघेही विधी शाखेच्या (लॉ) प्रथम वर्षात शिकत होते. सकाळी लेक्चर सुरू होण्यापूर्वी प्रिन्स पाठीवर बॅग घेऊन वर्गात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो संदीप आणि तिच्या एका मैत्रिणीशी शांतपणे बोलताना दिसतो. त्यानंतर ते तिघे मागच्या बाकावर जाऊन बसले. काही वेळ चर्चा झाल्यानंतर प्रिन्स अचानक उभा राहिला, त्याने बॅगेतून पिस्तूल काढले आणि संदीपच्या डोक्यात गोळी झाडली. संदीप जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हा भयानक प्रकार पाहून वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जीवाच्या आकांताने बाहेर पळ काढला. त्यानंतर प्रिन्सने स्वतःवरही गोळी झाडून घेतली.

या घटनेमुळे पंजाबमध्ये वाढती गन कल्चर आणि महाविद्यालयीन परिसरात शस्त्रास्त्रांसह विद्यार्थ्यांचा सहज वावर हा चिंतेचा विषय बनला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर कॉलेज कॅम्पसमध्ये मेटल डिटेक्टर्स आणि बॅग चेकिंग अनिवार्य करण्याची मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरेंद्र लांबा यावेळी बोलताना म्हणाले की, विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलले जाणे, हे तरुण पिढीतील वाढता टोकाचा राग आणि त्यांच्यातील मानसिक अस्वास्थ्य याकडे निर्देश करते. त्यामुळे दोघांचेही मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत. डिलिट केलेले चॅटस् किंवा कॉल रेकॉर्डस्वरून या हत्येमागचे नेमके कारण (उदा. एकतर्फी प्रेमातून प्रेमभंग किंवा इतर काही वाद) स्पष्ट होऊ शकेल. प्रिन्स राज यातून वाचला, तर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news