Zakir Ganai | तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

Zakir Ganai |
Zakir Ganai | तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा
Published on
Updated on

अनिल साक्षी

शोपियाँ : दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या व्यापक दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. बंदी घातलेल्या लष्कर-ए- तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर जाकिर गनई याला चकमकीत ठार करण्यात आले. त्याचा मृतदेह तसेच मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.

कॅमेऱ्यात दिसले दहशतवादी

या कारवाईची सुरुवात ३ जुलै रोजी झाली होती. शोपियाँमधील मीमंदर परिसरातील दाट सफरचंद बागांमध्ये बसविलेल्या अत्याधुनिक निगराणी कॅमेऱ्यांमध्ये दोन दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या होत्या. सात गावांमध्ये पसरलेल्या या संवेदनशील भागात लष्कराच्या व्हिक्टर फोर्सने अतिरिक्त जवान तैनात करून दहशतवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग सील केले.

जाकिर गनई हा २०२४ पासून लष्कर-ए-तोयबासाठी सक्रिय होता. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांसाठी तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याशीही त्याचा संबंध असल्याचा संशय आहे. त्याच्यासोबत असलेला लतीफ हा अद्याप सुरक्षा दलांच्या घेरावात आहे. तो गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबात सहभागी झाला आहे.

तुम्ही पळू शकता; पण लपू शकत नाही : पोलिसांचा इशारा

जम्मू-काश्मीर पोलिसांनी या कारवाईची माहिती देताना ‘एक्स’वर कठोर इशारा देणारी पोस्ट केली. ‘‘तुम्ही पळू शकता; पण आमच्यापासून लपू शकत नाही,’’ असे नमूद करत शोपियाँच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी), लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने संयुक्तपणे राबविलेल्या कारवाईत दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news