Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणींचे १०० व्या वर्षात पदार्पण, पंतप्रधान मोदींसह विविध मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भाजप मुख्यालयात विशेष पूजा-हवन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या, यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या, यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी ९९ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूजा आणि हवनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अडवाणी यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचे, राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे आणि भाजपच्या संघटनात्मक विस्तारातील भूमिकेचे यावेळी स्मरण करण्यात आले.

पंतप्रधान मोदींकडून अडवाणींच्या योगदानाचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अडवाणी आज त्यांच्या आयुष्याच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत असल्याचे नमूद करत मोदी यांनी त्यांच्या भारतासाठीच्या चिरंतन योगदानाचा गौरव करणारा विशेष लेखही लिहिला.

राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्याकडून शुभेच्छा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा, समर्पण आणि नेतृत्वाचा गौरव केला. भाजपच्या स्थापनेपासून पक्षाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे जीवन आणि आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी अडवाणी यांच्या उत्तम आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे शिल्पकार, तत्त्वनिष्ठ राजकारणी आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक अशा शब्दांत त्यांनी अडवाणी यांच्या कार्याचा गौरव केला. साध्या कुटुंबातून पुढे येत पक्षाचे संस्थापक सदस्य, राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे उपपंतप्रधान अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे शाह यांनी नमूद केले.

भाजप मुख्यालयात विशेष कार्यक्रम

अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या केंद्रीय कार्यालयात सकाळी १० वाजता पूजा आणि हवन करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. पूजा आणि हवनानंतर अडवाणी यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग, राजकीय वाटचाल आणि प्रमुख भाषणांवर आधारित सुमारे २० मिनिटांची विशेष चित्रफीत दाखविण्यात आली. त्यांच्या कार्याचा अनुभव आणि योगदान सांगणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या चित्रफितीही सादर करण्यात आल्या. यावेळी भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनीही कार्यक्रमाला संबोधित करून अडवाणी यांच्या राष्ट्र आणि पक्षासाठीच्या योगदानाचे स्मरण केले. प्रतिभा अडवाणी आणि पीयूष गोयल यांनी आपले विचार मांडले. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.