

पुढारी ऑनलाईन डेस्क
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअपमध्ये कवितेच्या माध्यमातून टीका केली होती. आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कामरा याचे सीडीआर व बँक अकाऊंट तपशील तपासणार असल्याचे म्हटले आहे. कामराच्या विरोधात सध्या वॉरंट निघाले असून पोलिस त्याचा तपास करत आहे.
दरम्यान कुणाल कामराच्या ऑफिस तोडफोड प्रकरणी ताब्यात घेतलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना जामिन मिळाला आहे. खार पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. . प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. कामरा याने केलेल्या टीकेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या खार येथील ऑफिसची तोडफोड केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
कामरा याने २०२२ मध्ये जे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताकारण घडले होते त्याच्यावर कवितेच्या माध्यमातून टीका केली होती. त्याने आपल्या स्टॅन्डअप शोमध्ये ही कवीता सादर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले होते. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘आंखो मे मस्ती....’ या गाण्याच्या चालीवर त्याने ही विडंबनात्मक कविता सादर केली होती. त्याच्यामध्ये शिंदे गुवाहाटीला गेल्याचा उल्लेख केला होता, तसेच ‘बाप चोरल्याचा’ उल्लेखही केला होता. कुणाल कामराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई ठाणे मध्ये याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनातही यावर जोरदार चर्चा झाली आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणे हे चुकीचे असून, हा अपमान सहन केला जाणार नाही अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. ते पुढे म्हणाले की हास्यविनोद करणे यात काही गैर नाही पण मोठ्या नेत्यांना बदनाम करुन त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य करणे पुर्णत चुकीचे आहे. कामरा याने माफी मागितली पाहिजे.