पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कोळसा खाणीत आज (दि.७) भीषण स्फोट झाला. सोमवारी सकाळी 10.30 वाजता भादुलिया ब्लॉकमधील कोळसा खाणीत ही घटना घडली. या स्फोटात सहाजण ठार झाले. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
गंगारामचक गावातील (जि.बीरभूम) खासगी कोळसा खाणीत ब्लास्टिंग सुरू असताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला स्फोटानंतर खाण कोसळली. त्यामुळे हा अपघात अधिक धोकादायक झाला. या दुर्घटनेत अनेक मजुरांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत.
बोलपूर पोलीस अधिक्षक राणा मुखर्जी यांनी माहिती देताना म्हटले आहे की, "खाण परिसरात स्फोट झाल्यानंतर, आम्ही येथे पोहोचलो आणि 6 मृतदेह सापडले, तीन लोक जखमी आहेत ज्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगाल सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकरणी स्फोटामागील कारणाचा पुढील तपास फॉरेन्सिक टीम करेल." असे पोलिस अधिक्षकांनी माध्यमांना माहिती देताना स्पष्ट केले आहे.
यापूर्वी बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी पोलिस स्टेशन हद्दीतील महेश गुडिया गावात दगड फोडताना दगडाच्या खाणीत अडकून जागीच काम करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू झाला होता.