पुढारी ऑनलाईन डेस्क: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने त्यांची वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द केली आहे. संदीप घोष एका महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचारप्रकरणी ते सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे.
पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची वैद्यकीय व्यवसायी नोंदणी रद्द केली आहे. त्यांना आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार-हत्येप्रकरणी तसेच कॉलेजशी संबंधित आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने (WBMC) RG कार मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची नोंदणी गुरुवारी (दि.१९ सप्टेंबर) WBMC द्वारे देखरेख केलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या यादीतून काढून टाकली. बंगाल मेडिकल ॲक्ट, 1914 च्या अनेक तरतुदींनुसार त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचेही सांगितले. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या याशिवाय, हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी देखील गोत्यात आहेत.
या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय व्यतिरिक्त आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी अभिजीत मंडल यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. ८-९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्यानंतर डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, राज्यातील ज्युनिअर डॉक्टर्स सातत्याने संपावर आहेत.