पुढारी ऑनलाईन डेस्क : Kolkata Rape-Murder Case : कोलकाता येथील बलात्कार-खून प्रकरणातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलवर जवळपास ५०० ते १००० लोकांच्या जमावाने हल्ला केला. कॉलेज आणि हॉस्पिटलची मोडतोड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान झाले आहे. अशी माहिती आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे सुरक्षा रक्षक प्रणॉय दास यांनी माध्यमांना दिली.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे सुरक्षा रक्षक प्रणॉय दास माध्यमांशी बोलताना म्हणाले, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कॅम्पस मध्ये जवळपास ५०० ते १००० लोकांच्या जमावाने हल्ला केला. ते म्हणाले ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी मी ड्युटीवर होतो. गुरुवारी (दि.१४) मध्यरात्री १ च्या सुमारास ही घटना घडली, आम्ही यावेळी कॉलेज आणि हॉस्पिटलचे गेट बंद केले पण जमावानेते तोडले. आम्ही १०-१२ लोक होते आणि त्यांनी मालमत्तेची तोडफोड केली संगणकापासून औषधांपर्यंत सर्व काही खराब केले. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान केले आहे."
कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार विभागात शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ (दि.१३) देशभरातील निवासी डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलाय. त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांचा गळा दाबल्याने त्यांची थायरॉईड कास्थी (कूर्चा) ऊती तुटली. तसेच त्यांच्यावर नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केल्याने त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खोल जखम आढळून आली असल्याचे चार पानी अहवालात म्हटले आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय ला पोलिसांकडून तपास हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. सद्यपरिस्थिीला सीबीआय घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी पिडीतेचा अनैसर्गिकरित्या मृत्यूचा गुन्हा नोंदवणे आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा जबाब नोंदवण्यास उशीर करण्याच्या कामावर खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हेच कारण जनतेच्या असंतोषाला वाचा फोडणारे ठरले.या घटनेच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (एफओआरडीए) आपला अनिश्चितकालीन संप पुकारला होता. पण केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर फोर्डाने संप मागे घेतला होता. त्यावेळी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनसह (एफएआयएमए.) इतर डॉक्टर संघटनांनी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आणि ठोस तोडगा मिळेपर्यंत त्यांचा संप सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले होते.
आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नसल्याचे जे.पी.नड्डा यांनी बैठकीत सांगितले होते. तत्पूर्वी निदर्शने आणि संप हे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहेत आणि यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो असे एम्सने सुचवले होते. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वादंग सुरू झाला आहे. आरोपांच्या फैरी ऐकमेकांवर झाडण्याचे काम राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. देशभरात स्वातंत्र्याच्या ७८व्या दिनाचा आनंद साजरा केला जातअसताना दुसऱ्या बाजूला कोलकातामध्ये प्रशासनाविरूद्ध रोष तीव्रतेने उफाळत आहे.