

Kolkata hotel fire
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे आज पहाटे एका हॉटेलला भीषण आग लागल्याने एका लहान मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बांगलादेशातील नागरिकांचा समावेश आहे, जे वैद्यकीय उपचारांसाठी कोलकाता येथे आले होते. ही आग मिर्झा गालिब स्ट्रीटवरील अग्निशमन केंद्राच्या अगदी शेजारीच लागली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २ च्या सुमारास ही आग लागली. एका बंद खोलीत आग लागल्यानंतर संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. अनेक लोक झोपेत असतानाच बेशुद्ध पडले आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत व्यक्ती या बांगलादेशी नागरिक होत्या आणि त्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलला पहाटे २ च्या सुमारास आग लागल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे."
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट किंवा एसीमधील स्फोटामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे; मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.