

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज (दि.१४ सप्टेंबर) अचानक आंदोलनकर्त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी कोलकाता येथील स्वास्थ्य भवनात पोहोचल्या. त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. आरजी कार हॉस्पिटलची रुग्ण कल्याण समिती विसर्जित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
स्वास्थ्य भवनाबाहेरील कनिष्ठ डॉक्टर आंदोलकांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे संकट सोडवण्याचा माझा शेवटचा प्रयत्न आहे. तुम्हाला न्याय मिळेल, याचे तुम्हाला आश्वासन देते."
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेव्हा आंदोलनकर्त्या डॉक्टरांना भेटायला आल्या तेव्हा आंदोलनस्थळी न्यायाच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरूच होती. मुख्यमंत्री कित्येक मिनिटे माईक घेऊन उभ्या राहिल्या. दरम्यान त्यांना त्यांचे भाषण देखील लवकर सुरू करता आले नाही. आंदोलनस्थळी काही काळ गोंधळ उडाला. मात्र मुख्यमंत्र्यांना बोलू द्यावे, अशी विनंती करण्यात आल्यावर आंदोलनकर्त्या डॉक्टांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे बोलणे ऐकूण घेतले.
जेव्हा ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टांची भेट घेत संवाद साधला तेव्हा डॉक्टरांनी, जोपर्यंत चर्चा होत नाही. आमच्या सर्व मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, तोपर्यंत कोणतीही तडजोड करण्यास आम्ही तयार नाही, असे आंदोलक डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
मी सुद्धा विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करूनच पुढे आले आहे. मीही माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे, त्यामुळे मला तुमचा संघर्ष समजतो. मला माझ्या पदाची चिंता नाही. काल रात्रभर पाऊस पडला, तुम्ही इथे विरोध करत बसला होता; पण मी रात्रभर काळजीत होते. तुमच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर मी त्यांचा अभ्यास करेन. मी एकटी सरकार चालवत नाही, तुमच्या मागण्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अभ्यास करून नक्कीच तोडगा काढेन. जो कोणी दोषी असेल त्याला नक्कीच शिक्षा होईल. यासाठी मी तुमच्याकडून थोडा वेळ मागत आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
राज्य सरकार तुमच्यावर (आंदोलक डॉक्टर) कोणतीही कारवाई करणार नाही. मी तुम्हाला कामावर परत येण्याची विनंती करते. रुग्णालयाचा विकास, पायाभूत सुविधा, सुरक्षेशी संबंधित सर्व कामे सुरू झाली आहेत आणि पुढेही केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.