नालंदा (बिहार); वृत्तसंस्था : नालंदा हे केवळ नाव नाही, ते एका संस्कृतीचे, ज्ञानाचे प्रतीक आहे. एक मूल्य आहे… एक मंत्र आहे… एक अभिमान आहे… एक गाथा आहे. नालंदा हा खरे तर सत्याचा उद्घोष आहे. कुणी त्याला आग लावून दिली, तर पुस्तके जळू शकतात, विद्यापीठाची इमारत जळू शकते; पण ज्ञानाच्या शत्रूंनी कितीही ठरविले, तरी ते विद्येचा नाश करू शकत नाहीत, असे सूचक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यावेळी उपस्थित होते. बख्तियार खिलजी या आक्रमकाने 1190 च्या सुमाराला हे विद्यापीठ जाळून खाक केले होते. त्याचा संदर्भ पंतप्रधान मोदींच्या या प्रतिपादनामागे होता. विद्यापीठाच्या पुनर्उभारणीत पंतप्रधान मोदी यांचे मोठे सहकार्य लाभले, अशी कृतज्ञता नितीश कुमार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांन 20 मिनिटे जुन्या नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांसोबत घालविली.