

पुढारी ऑनलाईन डेस्क: Manmohan Singh Family Tree | देशातील आर्थिक सुधारणांचे जनक आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि.२६) रात्री निधन झाले. मनमोहन सिंग यांनी आपल्या कतृत्त्वाचा मागे असा वारसा सोडला आहे, जो त्यांना देशातील महान व्यक्तींमध्ये स्थान देतो. मनमोहन सिंग हे एक विचारवंत, आर्थिक सुधारणांचे प्रणेते आणि सार्वजनिक सेवेतील त्यांचे समर्पणासाठी ओळखले जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. आज (दि.२७) संध्याकाळपर्यंत त्यांच्या तीन मुली अमेरिकेतून भारतात येणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तीन मुली आहेत. माजी पंतप्रधानांच्या तीनही मुलींचे आपापल्या क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग 65 वर्षांची आहे. त्यांना दोन मुले आहेत. तर दुसरी मुलगी दमन सिंग 61 वर्षांची आहे. त्यांना एक मुलगा आहे. तर तिसरी मुलगी अमृत सिंग 58 वर्षांची आहे. अशा स्थितीत मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमधील (आता पाकिस्तानमध्ये) चकवाल जिल्ह्यातील गाह गावात झाला. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून डीफिल केले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांसह सरकारमध्ये अनेक महत्त्वाची प्रशासकीय पदे भूषवली.
मनमोहन सिंग 1991 मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले आणि त्यांनी ऐतिहासिक आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली. मनमोहन सिंग हे आर्थिक उदारीकरण तसेच माहिती अधिकार कायदा, मनरेगा, आधार कार्ड आणि आरटीई तसेच अमेरिकेसोबत नागरी आण्विक करारासाठी नेहमीच स्मरणात राहतील. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर त्यांच्या कुटुंबात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली यांचा समावेश आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना उपिंदर सिंग, अमृत सिंग आणि दमन सिंग या तीन मुली आहेत. माजी पंतप्रधानांच्या तीन मुलींचे आपापल्या क्षेत्रात मोठे नाव आहे. चला तर मग जाणून घेऊया मनमोहन सिंग यांच्या मुली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल-
मनमोहन सिंग यांची मोठी कन्या उपिंदर सिंग या सुप्रसिद्ध इतिहासकार आणि अशोका विद्यापीठाच्या डीन आहेत. यापूर्वी त्या दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख होत्या. उपिंदर सिंग यांनी सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली आणि मॅकगिल विद्यापीठ, मॉन्ट्रियल येथे शिक्षण घेतले. त्यांनी भारताचा प्राचीन इतिहास, पुरातत्व आणि राजकीय विचार यावर संशोधन केले आहे. उपिंदर सिंग यांच्या 'ए हिस्ट्री ऑफ एन्शियंट अँड अर्ली मिडीव्हल इंडिया' आणि 'पोलिटिकल व्हायोलन्स इन एन्शियंट इंडिया' या पुस्तकांचे खूप कौतुक झाले आहे. सामाजिक विज्ञानातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना इन्फोसिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मनमोहन सिंग यांची दुसरी मुलगी, अमृत सिंग, एक प्रसिद्ध मानवाधिकार वकील आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमध्ये कायद्याच्या अभ्यासाच्या प्राध्यापक आहेत. अमृत सिंग हे रूल ऑफ लॉ इम्पॅक्ट लॅबचे कार्यकारी संचालक देखील आहेत. अमृत सिंग यांनी प्रतिष्ठित येल लॉ स्कूल, ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अमृत सिंग हे जागतिक मानवाधिकार विषयातील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने युरोपियन कोर्ट ऑफ ह्यूमन राइट्स आणि आफ्रिकन कमिशन ऑन ह्यूमन अँड पीपल्स राइट्स येथे झालेल्या सुनावणीतही भाग घेतला आहे. द गार्डियन आणि द न्यूयॉर्क टाईम्स यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्येही ती लेख लिहिते.
दमन सिंग लेखनाच्या जगात सक्रिय आहेत आणि त्यांनी मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील 'स्ट्रिक्टली पर्सनल मनमोहन आणि गुरशरण' हे पुस्तक लिहिले आहे. मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरीच माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. याशिवाय दमन सिंग यांनी 'द सेक्रेड ग्रोव्ह आणि नाइन बाय नाइन' हे लेखनही केले आहे.