

Khan Sir
पाटणा: पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक फैजल खान (खान सर) यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर झालेल्या हल्ला प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेक नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर, पोलिसांनी काल नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फैसल खान (खान सर) यांचे नाव समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता खान सर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
शस्त्र कायदा आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी खान सर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणी पोलीस पथकाने थेट खान सर यांच्या कोचिंग सेंटरमध्ये जाऊन त्यांची चौकशी केली आहे.
खान सर यांच्या कोचिंगवर जेव्हा हल्ला झाला होता, तेव्हा 'हल्लेखोरांनी ५ ते ६ राउंड गोळीबार केला' असा आरोप खान सरांनी केला होता. मात्र, आता या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये खान सरांचे स्वतःचे सुरक्षारक्षक हवेत गोळीबार करताना दिसत आहेत.
गोळीबार प्रकरणी खान सरांच्या दोन्ही सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांना पाटणा येथील बेऊर जेलमध्ये पाठवण्यात येत आहे.
खान सरांच्या कोचिंगवरील हल्ल्याच्या संदर्भात पोलीस कसून तपास करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 'ज्ञान बिंदू' कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्यासह एकूण तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षारक्षकांचा गोळीबाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस खान सरांची भूमिका आणि त्यांनी केलेल्या दाव्यांची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.