Brain Eating Amoeba | धोक्याची घंटा! केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण सापडला

आतापर्यंत ३ मुलांचा अमिबा संसर्गामुळे मृत्यू
Brain Eating Amoeba
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा संसर्ग झाल्याचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या (Brain Eating Amoeba) दुर्मिळ अमिबा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) चा संसर्ग झाल्याचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. याआधी येथे एका १४ वर्षाच्या मुलाचा अमिबामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. केरळमधील कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली होती. आता आमिबाच्या आणखी एक प्रकरणाची नोंद झाली आहे. यामुळे येथील अशा रुग्णांची संख्या चार झाली आहे. आमिबा हा दुषित पाण्यात आढळणाऱ्या मुक्त-जिवंत अमिबामुळे होणारा दुर्मिळ मेंदूचा संसर्ग आहे.

Summary

अमिबा मानवी शरीरात कसा प्रवेश करतो?

  • अमिबा हा साचलेल्या पाण्यात राहतो.

  • नाकाच्या पातळ त्वचेतून तो आत प्रवेश करतो.

  • अमिबा मेंदूतील मांस खातो म्हणून त्याला मेंदू खाणारा अमिबा असे म्हटले जाते.

  • अमिबा असलेले पाणी प्यायल्याने संसर्ग होत नाही.

Brain Eating Amoeba
Amoeba infection | पोहताना डोक्यात शिरकाव, मेंदू खाणाऱ्या अमीबाने घेतला युवकाचा बळी

पीटीआयच्या वृत्तानुसार, सदर रुग्ण हा १४ वर्षांचा मुलगा असून तो उत्तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील पायोली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये मे महिन्यापासून अशा चार रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण अल्पवयीन आहेत. त्यापैकी तिघांचा आधीच मृत्यू झाला आहे.

लवकर झाले निदान

नवीन आढळून आलेल्या प्रकरणात, सदर अमिबाबाधित मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एकाने सांगितले की, त्याला १ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती आता सुधारत आहे, असे पीटीआयने पुढे वृत्तात म्हटले आहे. डॉक्टरांनी असेही सांगितले की, शनिवारी रुग्णालयात संसर्ग झाल्याचे लवकर निदान झाले आणि त्याच्यावर परदेशातील औषधांसह उपचारदेखील तत्त्काळ करण्यात आले.

Brain Eating Amoeba
Brain-eating amoeba | नळाचे पाणी वापरताय! मेंदू खाणाऱ्या अमिबाने एकाचा बळी, जाणून घ्या लक्षणे

आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू

३ जुलै रोजी केरळमध्ये अमिबाची लागण झालेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी मलप्पूरममधील ५ वर्षांची मुलगी आणि कन्नूरमधील १३ वर्षांची मुलगी यांचा अनुक्रमे २१ मे आणि २५ जून रोजी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे मृत्यू झाला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यात त्यांनी आणखी संसर्ग टाळण्यासाठी अस्वच्छ पाण्यात आंघोळ करू नये यासह अनेक सूचना दिल्या होत्या.

कसे होते संक्रमण?

अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार, अमिबा हा माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो. उदा. तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे. ब्रेन इटिंग अमिबा असे त्याला म्हटले जाते. अमिबा असलेले पाणी नाकात गेले, की मेंदू संक्रमित होतो. हा अमिबा असलेले पाणी प्यायल्याने मात्र संसर्ग होत नाही. हा अमिबा मेंदूतील मांस खातो. प्रतिजैविकांनी तो नष्ट केला जाऊ शकतो; पण बहुतांश प्रकरणांत उपचाराला उशीर झाल्याने रुग्ण दगावल्याचे दिसून आले आहे.

आजाराची लक्षणे काय?

ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news