स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी केजरीवालांचा पीए विभवकुमारला अटक

स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी केजरीवालांचा पीए विभवकुमारला अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून त्यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ही कारवाई केली.

स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने आपला वैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांना सादर केला. या अहवालात मालीवाल यांच्या उजव्या गालावर आणि डाव्या पायावर अशा ४ ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी हा अहवाल प्राप्त होताच विभवकुमार यांच्याविरुद्ध गंभीर व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.

काय आहे प्रकरण?

स्वाती मालीवाल १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. ड्रॉईंग रूममध्ये त्या केजरीवाल यांची वाट बघत असताना विभवकुमारने त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे.

याबाबत पोलिसांना फोन करून त्यांनी घटनेची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी तक्रार दाखल केली नव्हती. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी १४ मे रोजी, अशी घटना घडल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. विभवकुमार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

मात्र, आतापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाती मालीवाल यांची तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर मालीवाल यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त होताच विभवकुमार यांना अटक केली.

स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

स्वाती मालीवाल प्रकरण वेगवेगळे वळण घेत असताना आता यात आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कथित मारहाण प्रकरण घडले त्या दिवशी स्वाती मालीवाल अरविंद केजरीवाल यांच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत तसेच या व्हिडिओमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाल्याचे दिसत नाही. मात्र त्या स्वतःला पोलिसाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आपच्या नेत्या अतिशी यांनीही या व्हिडिओचा दाखला देत आजच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले. त्यानंतर आम आदमी पक्ष आणि स्वाती मालीवाल दोघांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news