

पुढारी ऑनलाईन डेस्क: Delhi Assembly Election Result |दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.८) जाहीर झाला. दुपारपर्यंत भाजपला निर्णायक यश मिळाले. तर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हारले. मनिष सिसोदीया यांचा देखील जंगपुरा मतदारसंघातून पराभव झाला. दरम्यान भाजप ४८ तर आम आदमी पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्य' वर आल्याचे दिसते. १९९३ मध्ये भाजपने पहिल्यांदा दिल्ली निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीत यश मिळत सत्तापालट झाली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निर्णायक निकाल हाती आल्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, "आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपचे अभिनंदन करतो".
पुढे ते म्हणाले, "मला आशा आहे की, लोकांनी ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे ती सर्व आश्वासने पूर्ण करतील. गेल्या १० वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. आम्ही केवळ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहू आणि त्यांची सेवा करत राहू...", असेही दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे,