Kathua Terror Attack : 2 महिन्यात 2 भाऊ शहीद! नेगी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Kathua Terror Attack
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उत्तराखंडमधील रायफलमन आदर्श नेगी (वय 26) शहीद झाले. Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kathua Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उत्तराखंडमधील पाच जवान शहीद झाले. रायफलमन आदर्श नेगी (वय 26) हे या शहीद जवानांपैकी एक आहेत. ते टिहरी जिल्ह्यातील कीर्तीनगर येथील थाटी (डागर) गावचे रहिवासी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. लोक नेगी कुटुंबियांच्या सात्वनासाठी त्यांच्या घरी पोहोचू लागले. तत्पूर्वी मुलगा शहीद झाल्याची बातमी ऐकून आदर्श यांच्या आईची शुद्ध हरपली. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आदर्श नेगी 2018 साली गढवाल रायफलमध्ये भरती झाले होते. देशाच्या सुरक्षासेवेची 6 वर्षे झाली असतानाच त्यांना वीरमरण आले. नेगी कुटुंबाला हा दोन महिन्यातील दुसरा धक्का आहे. आदर्श यांच्या आधी त्यांचे 33 वर्षीय चुलत बंधू मेजर म्हणून कार्यरत असताना शहीद झाले होते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांना वीरमरण आले. या दु:खातून नेगी कुटुंबिय सावरत होते. पण काही दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. आदर्श नेगी शहीद झाल्याचे समजताच गावातील प्रत्येक व्यक्ती सुन्न झाली.

‘फक्त दोन महिन्यांपूर्वी आम्ही आमचा एक मुलगा गमावला जो देशाची सेवा करताना मरण पावला. तो मेजर होता. आता, आम्हाला समजले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये एका ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पौरी-गढवाल भागातील पाच लष्करी जवान शहीद झाले आहेत. ज्यामध्ये आदर्शचाही समावेश आहे,’ अशी भावना आदर्शचे काका आणि उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील थाटी डागर गावचे रहिवासी बलवंत सिंग नेगी यांनी व्यक्त केली आहे. बलवंत नेगी यांचा मुलगा मेजर प्रणय नेगी हे लेहमध्ये कार्यरत होते आणि 30 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.

बलवंत नेगी पुढे म्हणाले की, ‘ आदर्श हा खूप हुशार मुलगा होता. त्याने गावातल्या शाळेतून इंटरमीडिएट पूर्ण केले. त्यानंतर त्याने गढवाल विद्यापीठातून बीएससीचे शिक्षण घेतले. त्यानंतर सैन्यात नोकरी मिळाली आणि त्याने आता देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत.’

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाच लष्करी जवानांमध्ये आदर्श नेगी यांचा समावेश होता. कठुआपासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर नियमित गस्तीवर असलेल्या लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि त्यानंतर गोळीबार केला.

आदर्श नेगी 2018 मध्ये गढवाल रायफल्समध्ये सामील झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे शेतकरी वडील, आई, भाऊ आणि मोठी विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांचा भाऊ चेन्नईत काम नोकरीस आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news