

Karur stampede case
नवी दिल्ली: तामिळनाडूतील करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाध्यक्ष आणि दाक्षिणात्य अभिनेते विजय याची आज (दि. १२) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुमारे सहा तास कसून चौकशी केली.
दिल्लीत कडेकोट बंदोबस्त विजय सोमवारी सकाळी १०:३० वाजता खासगी विमानाने दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर तो थेट सीबीआय मुख्यालयात पोहोचला. यावेळी मुख्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही चौकशी केली. विजय यांच्यासोबत पक्षाचे नेते आधव अर्जुन आणि निर्मल कुमार हेदेखील दिल्लीत उपस्थित होते.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआय चौकशीदरम्यान विजयने स्पष्ट केले की, या दुर्दैवी घटनेला त्यांचा पक्ष किंवा पक्षाचे कोणतेही पदाधिकारी जबाबदार नाहीत. आपली उपस्थिती अधिक गोंधळ निर्माण करू शकते, असे वाटल्याने आपण कार्यक्रमस्थळावरून निघून गेलो होतो."
पोलिसांच्या दाव्यावर विजयचे स्पष्टीकरण यापूर्वी पोलिसांनी असा दावा केला होता की, विजय यांनी कार्यक्रमस्थळी येण्यास उशीर केल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. यामुळे चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी 'टीव्हीके'चे जिल्हा सचिव मथियाझगन, सरचिटणीस बुसी आनंद आणि संयुक्त सरचिटणीस सी.टी. निर्मल कुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
२७ सप्टेंबर २०२५ रोजी तामिळनाडूतील करूर येथे विजय यांच्या एका प्रचार सभेदरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत महिला आणि मुलांसह ४१ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६० हून अधिक जण जखमी झाले होते. सभेसाठी १० हजार लोकांची परवानगी असताना प्रत्यक्षात सुमारे ५० हजार लोक जमले होते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि तपास सुरुवातीला या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) केला जात होता. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विधाने आणि प्रकरणाला आलेले राजकीय वळण पाहून सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायाधीश अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समिती या तपासावर देखरेख करत आहेत.