

Karnataka Power Tussle: कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येणार खांदे पालट होणार अशा चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या घडामोडी पाहता आता खांदेपालट जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपाल गेहलोत यांची २८ मे रोजीची भेटीची वेळ मागितली आहे. याबाबतचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
विशेष म्हणजे गुरूवारी सकाळी सिद्धरामय्या हे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची ब्रेकफास्टवेळी भेट घेणार आहेत. राज्यातील हे दोन मोठे नेते दिल्लीतील आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे निवसास्थान कावेरी इथं शिवकुमार यांना ब्रेकफास्टसाठी बोलवण्यात आलं आहे.
२०२५ रोजी देखील अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी कर्नाटक काँग्रेसमध्ये झाल्या होत्या. त्यावेळी सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची अडीच वर्षे पूर्ण केली होती. त्यावेळीदेखील नेतृत्व बदलाची चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवकुमार यांना पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी विनंती केली होती. पुढची निवडणूक ही २०२८ मध्ये होणार आहे.
नवी दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसी सचिव केसी वेणुगोपाल आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची उपस्थिती होती. यावेळी पक्षाकडून आगामी राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धरामय्या यांनी देखील मुख्यमंत्रीपद बदलण्यात येणार असल्याची शक्यता नाकारली होती.
या बैठकीवेळी गांधी परिवार आणि खरगे यांनी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत अनेक तास चर्चा केली होती. ही चर्चा वेगवेगळी करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत पुढचा निर्णय हा राज्य सभा निवडणुकीनंतर घेण्यात येईल अशी शक्यता वर्तवली होती. राज्यसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे.